प्रियकरासोबत थाटायचा होता संसार
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
पळून जाऊन प्रियकरासोबत लग्न करून त्याच्यासोबत राहण्याची तिची इच्छा होती. त्यामध्ये अडसर ठरणार्या दोन मुलांना संपवण्याचा डाव तीने घरात कोणी नसताना साधला आणि दोन चिमुकल्यांची हत्या केली. तिच्या प्रियकरासोबत होणार्या मोबाईल कॉलवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखने हा गुन्हा उघडकीस आणला.
यवतमाळ येथील शितलचे लग्नापुर्वी गावातील जाधव नामक तरुणासोबत गेल्या सहा वर्षापासून प्रेम होते. तो ट्रक चालक आहे. तिचे लग्न पसंतीच्या मुलासोबत झाले नाही. घरच्यांनी सदानंद पोलेसोबत लग्न लावून दिले. लग्नानंतर ती अलिबाग तालुक्यातील किहीम आदीवासीवाडी जवळील दाजिया पटोले यांच्या वाडीमध्ये शिक्षक कॉलनीमध्ये पतीसोबत राहू लागली. लग्नानंतर तिने एक मुलगी व एक मुलगा अशा दोन लेकरांना जन्म दिला. शितल तिच्या पतीसोबत राहत असली, तरी तिचा जीव प्रियकरामध्ये गुंतला होता. सतत त्याला फोन करणे, त्याच्यासोबत पळून जाण्याचा प्लॅन ती आखत होती. मात्र तिची मुले तिला पळून जाण्यास अडसर ठरत होती. काय करावे, असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला होता.
नवरा बाजारात गेल्यावर मुलांना मारण्याचा आखला प्लॅन रविवारी (दि .31) मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास शितलचा नवरा वायशेतमध्ये आठवडा बाजारात खरेदीसाठी गेला होता. या संधीचा फायदा घेत तिने गमजाने त्यांचे नाक व तोंड दाबून त्यांना ठार केले. सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास तिचा नवरा मुलांना खाऊ व चप्पल घेऊन मोठ्या आवडीने आला. शितल घरासमोर भांडी घासण्यात मग्न असल्याचे भासवत होती. झोपी गेलेल्या मुलांना खाऊ देण्यासाठी सदानंद उठविण्यास गेला असता, दोघेही उठले नाही. ते बेशुध्द अवस्थेत दिसून आले. त्यांना अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यांचा मृत्यू अगोदरच झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. या दोन्ही मुलांचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मुंबईतील जे. जे. रुग्णालयात केले.
पोलिसी दणका मिळाल्यावर झाली बोलकी प्रेमात अडथळा ठरणार्या पाच व तीन वर्षांच्या चिमूकल्यांना आईनेच मारण्याचा प्रकार पोलिसांनी पाच दिवसात उघडकीस आणला. स्थानिक गून्हे अन्वेषण शाखा व मांडवा सागरी पोलिसांनी तपास सुरु केला. शवविच्छेदनाच्या अहवालानूसार मुलांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी शितलचे मोबाईल कॉल चेक केले. त्यामध्ये यवतमाळ येथील जाधव नामक व्यक्तीसोबत जास्त संपर्क असल्याचे दिसून आले. एका दिवसांत जवळपास 31 वेळा तिने प्रियकराला फोन केल्याची माहिती अनधिकृतपणे समोर आली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर महिला पोलिसांकडून त्या महिलेची कसून चौकशी केल्यावर तिने खून केल्याचे कबूल केले.