खालापुरात गर्भवती गाय वासराची हत्या; ग्रामस्थ आक्रमक

| खोपोली | वार्ताहर |

महड गावातील गोठ्यात बांधलेली गाय आणि तिच वासरू या दोघांची चोरी करून हाल गावात एक पत्र्याच्या खोलीत हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

गोठ्यातील गाय व वासरू नसल्याचे हे शेतकरी तुषार दत्तू पाटील यांच्या लक्षात आल्याने शोधाशोध सुरु केली. मंगळवारी सकाळच्या दरम्यान शोध मोहिमेवर असताना या पत्र्याच्या शेड मध्ये गाय व वासरू मृत अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात नजरेस पडली. गाय ही गाभण होती. घटनेचे वृत्त समजताच महड गावातील ग्रामस्थ व बजरंग दल कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. तातडीने खालापूर पोलिसांना पाचारण करण्यात आले व आरोपीस अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ जागा मालकाला ताब्यात घेतले मात्र नागरिकांचा रोष वाढतच गेला. येथील गुरांची कत्तल करण्यासाठी तयार केलेले सदरचे शेड हटविण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आणि नागरिकांचाही संयम सुटत चालल्याने नागरिकांनीच हे पत्र्याचे शेड उध्वस्त करण्याचे पाऊल उचलले गेले. पोलिसांनी जमावाला अडवून पत्र्याचे तात्पुरते तयार केलेले शेड हटविण्यात आले मात्र तरीही जमाव शांत होत नसल्याने यानंतर आरसीएफ जवान व पोलीस दल तैनात करून जमाव पागविण्यात आला.

या प्रकाराने मोठा गोंधळ निर्माण झाल्याने परिस्थिती नियंत्रणांत आणण्यासाठी प्रभारी पोलीस उप विभागीय अधिकारी विजय लगारे, पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आरोठे व सहकारी कर्मचारी वर्गाने जमावाला शांत केले. सदरचे सर्वच शेड तोडावे अशी हल्लाबोल करीत कार्यकर्त्यांनी केल्याने शेवटी पोलीस बळाचा वापर करावा लागला. जेसीबीने गाय वासराचे दफन करण्यात आले व आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला.

Exit mobile version