। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन नगर परिषदेची घंटागाडी श्रीवर्धन बाजारपेठेतून सकाळी व संध्याकाळी अशी दोन वेळा कचरा उचलण्यासाठी फिरत असते. प्रत्येक दुकानदार आपला कचरा कचराकुंडीमध्ये भरून एका बाजूला ठेवत असतो. घंटागाडीवरील कर्मचारी कचराकुंडी उचलून कचरा घंटागाडीमध्ये टाकून घेत असतात. नगरपरिषेकडून नागरिकांसाठी कचरा उचलण्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध असताना देखील काही व्यापारी आपला कचरा प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून रस्त्यावरती ठेवत आहे.
तसेच, श्रीवर्धन बाजारपेठेमध्ये काही नागरिक व व्यापारी कचरा गटारामध्ये फेकण्याचा प्रकार देखील करत असतात. बाजार पेठेतील दादर पुलाजवळ असणार्या एका इमारतीसमोर रोज रात्री गटारामध्ये कचरा टाकण्यात येतो. नगर परिषदेचे कर्मचारी रोज सकाळी हा कचरा उपसून नेत असतात. परंतु, दुसर्या दिवशी पुन्हा ते गटार कचर्याने भरले जाते. तसेच, श्रीवर्धन शहरातील काही नागरिक सुद्धा आपल्या घरी कचराकुंडी न ठेवता कचरा गटारात फेकतात.
तरी श्रीवर्धन नगरपरिषदेने शहरातील नागरिकांना तसेच बाजारपेठेतील दुकानदारांना आपापला कचरा कचराकुंडीमध्ये भरून ठेवावा. नगरपरिषदेची घंटागाडी येऊन घेऊन जाईल, अशा प्रकारे सूचना देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विराज लबडे यांनी या प्रकरणी गंभीरपणे दखल घ्यावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.