कापडे खुर्द व किनेश्वरचे शेतकरी भूसंपादनाच्या मोबदल्यास वंचित
| पोलादपूर | शैलेश पालकर |
2009 मध्ये किनेश्वर लघुपाटबंधारे योजनेला औरंगाबाद महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने 2009-10 मध्ये 7 कोटी 64 लाख 50 हजार 826 रूपये खर्च करण्यास प्रशासकीय मंजूरी दिल्यानंतर 2018 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी धरणाच्या भूमिपूजनाचा नारळ फोडण्यात आला. मात्र, भूसंपादनाच्या मोबदल्यास किनेश्वर आणि कापडे खुर्दचे शेतकरी वंचित असताना याच परिसरामध्ये मोठया प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी कमाल जमिनधारणा कायद्यातील निर्बंधांकडे दूर्लक्ष करून खासगीरित्या खरेदी करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अवजड वाहनांच्या ये-जा करण्याने खराब झालेल्या रस्त्याचे डांबरीकरण व कोसळलेल्या पुलाची उभारणी राज्यसरकारच्या तिजोरीतून करूनही संबंधित ठेकेदाराने या धरणाच्या कामाकडे सपशेल दूर्लक्ष केल्याने धरणाचे काम गेल्या 7 वर्षांपासून रखडले आहे.
पोलादपूर तालुक्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी अति दुर्गम भागातील किनेश्वर लघुपाटबंधारे योजनेला औरंगाबाद महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने 2009-10 मध्ये 7 कोटी 64 लाख 50 हजार 826 रूपये खर्च करण्यास प्रशासकीय मंजूरी प्राप्त झाली असून, तत्पूर्वीचे लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी यासाठी मागणी केली असल्याचे टिपणीमध्ये नमूद करण्यात आले आहे. सदर योजनेच्या क मुख्य कामे आणि ‘ड’ विमोचकाच्या कामाच्या अंदाजपत्रकास मुख्य अभियंता स्थानिक स्तर लघुपाटबंधारे पुणे यांनी तांत्रिक मान्यता दिली असून धरणाची लांबी 205 मीटर्स असून सांडव्याची लांबी 40 मीटर व उंची 28 मीटर असून हे धरण नैसर्गिक नाल्यावर बांधण्यात येणार आहे. या धरणातील एकूण पाणीसाठा 1680.93 स.घ.मी. एवढा होणार असून, उजवा तीर कालवा 3 कि.मी. आणि डावा तीर कालवा 2 कि.मी. असणार आहे. या किनेश्वर धरणामुळे 111 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे या संदर्भात ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या लघुपाटबंधारे स्थानिक स्तर ठाणे च्या कार्यकारी अभियंता व माणगांव लघुपाटबंधारे उपविभागामार्फत टिपणीमध्ये नमूद केले आहे.
मंजूरीनंतर तब्बल 9 वर्षांनंतर 2018 मध्ये या धरणाच्या कामासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तत्कालीन आ.भरतशेठ गोगावले यांनी नारळ फोडून शुभारंभ केला. ठेकेदार नियुक्त केल्यानंतर या धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याची दूरवस्था अवजड वाहने जाऊन खराब झाली. तसेच अवजड वाहनांमुळे या रस्त्यावरील पुलदेखील कमकुवत होऊन अतिवृष्टीमध्ये कोसळला होता. यानंतर या पुलाचे नव्याने बांधकाम आणि खराब झालेल्या रस्त्याचे काम शासनाच्या तिजोरीतून निधी उपलब्ध करून महाविकास आघाडीच्या काळात करण्यात आला.
सद्यस्थितीत किनेश्वरच्या नियोजित धरणामुळे 111 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याची अपेक्षा असताना धरण आणि कालव्यासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदले मिळाले नाहीत. मात्र, किनेश्वर धरण परिसरातील कापडे खुर्द, किनेश्वर या गांवातील शेकडो एकर जमिनींची खरेदीखते एकाच व्यक्तीच्या नावाने कमाल जमिनधारणा कायद्यातील निर्बंधांकडे दूर्लक्ष करून खासगीरित्या खरेदी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही जमीन खरेदी धरणासाठी भूसंपादित क्षेत्रापैकी आहे अथवा डॅमच्या परिसरात शेतीऐवजी महाबळेश्वर रस्ता रूंदीकरणाच्या पार्श्वभूमीवर रिसॉर्ट अथवा फार्महाऊस विकसित करण्यासाठी आहे, याचा उलगडा होऊ शकला नाही. संबंधित जमिनी भूसंपादित क्षेत्रापैकी असल्यास शेतकऱ्यांना अद्याप या जमिनीचा शासनाकडून मोबदला मिळाला नसल्याने याच जमिनीचे खरेदी अथवा विक्रीचे व्यवहार कसे होऊ शकतात? अशी शंका स्थानिक शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. (उत्तरार्ध उद्याच्या अंकात)






