विमला तलाव उद्यानात घाणीचे साम्राज्य

| उरण । वार्ताहर ।
उरण नगर पालिकेच्या दुर्लक्षित पणामुळे विमला तलाव उद्यानात घाणीचे साम्राज्य पसरत आहे. अशा घाणीच्या साम्राज्यामुळे या ठिकाणी सरपटणार्‍या सापांचा वावर वाढला आहे. त्यामुळे उद्यानात फेरफटका मारायला येणार्‍या नागरीकांबरोबर उद्यानात बागडणार्‍या लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तरी उरण नगर पालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगले यांनी लक्ष केंद्रित करावे अशी मागणी नागरीक करत आहेत.

जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी प्रत्येक शासकिय प्रशासनाने आप आपल्या कार्यालयातील परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा सुचना दिल्या आहेत. परंतु नगर पालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगले यांनी या सुचनांचे पालन केले नसल्याचे चित्र कार्यालयातील कामकाजातून दिसून येत आहे. त्यातच नगर पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या अधिकार्‍यांनी, कर्मचार्‍यांनी नागरीकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असणार्‍या विमला तलाव उद्यान परिसरातील घाणीचे साम्राज्य दुर करण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याने उद्यानात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

सध्या या उद्यान्यात उद्भवणार्‍या घाणीच्या साम्राज्या मुळे सरपटणार्‍या सापांचा वावर वाढला आहे.तरी एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता सदर विमला तलाव उद्यानातील घाणीचे साम्राज्य दुर करण्यासाठी नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Exit mobile version