आक्षीच्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
तात्काळ दुरुस्तीची प्रवासी, वाहनचालकांची मागणी

। चौल । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील आक्षी-नागाव हे पर्यटकांचे आवडीचे ठिकाण. मुख्यत्वे येथील समुद्रकिनारा आणि नारळी-पोफळीच्या बागा हे पर्यटकांचे आकर्षण. त्यामुळे शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची याठिकाणी जत्रा भरते. परंतु, अलिबागहून नागावाकडे येताना आक्षी पुलावरील मोठ मोठ्या खड्ड्यांमध्येच पर्यटकांचे स्वागत होत आहे. त्यामुळे अनेकांचा हिरमोड होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सपशेल दुर्लक्ष झाले आहे.
अलिबागपासून सुमारे पाच ते सहा कि.मी. अंतरावरील आक्षी-नागाव हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला येत आहे. परंतु, नागावमध्ये येण्याच्या अगोदरच आक्षी पुलावरील खड्ड्यांमध्ये पर्यटकांचे स्वागत होत आहे. त्यामुळे पर्यटकांसह प्रवासी आणि वाहनचालकांमध्येही संतापाचे वातावरण आहे. पावसाळ्यापासून या पुलावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. आज पावसाळा संपून आज दोन महिने झाले आहेत. परंतु, रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यायला सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्याप वेळ मिळालेला नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

रात्रीच्या वेळी अंधार
आक्षी पुलाच्या निर्मितीपासून आजतागायत या पुलावर पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी पुलावर अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. आधीच पुलाची उंची मुख्य रस्त्यापेक्षा जास्त असल्याने समोरुन आलेले वाहन लगेच लक्षात येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याठिकाणी पथदिवे लावण्यात यावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

जुना पूल धोकादायक

आक्षीचा जुना पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने नवीन पुलाची उभारणी करण्यात आली. परंतु, नवीन पुलावरील खड्डे असह्य होत असल्याने नाईलाजाने वाहनचालक जुन्या पुलाचा पर्यायी वापर करीत आहेत. परंतु, अशी जीवघेणी वाहतूक तातडीने बंद होणे गरजेचे आहे. कारण, एखादा अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण?

Exit mobile version