संबंधित विभागाकडून उपाययोजनेची अपेक्षा
| चौल | प्रतिनिधी |
हा कचरा नेमका कोणाचा, असा प्रश्न आक्षी आणि ढवरच्या नागरिकांना पडला असून, अंगणातला कचरा एकमेकांकडे ढकलावा, तसा हा कचर्याचा प्रश्न टोलवला जात आहे. अलिबाग तालुक्यातील मुख्य रस्त्यावर आक्षी असून, या पुलावरुन आक्षी, नागाव तसेच पुढे रेवदंडा, मुरुड आदी पर्यटनस्थळांकडे जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे रस्त्यावरुन स्थानिकांसह पर्यटकांची वर्दळ सुरू असते. आक्षी पुलाच्या खाली रस्त्यावर मोठ मोठे कचर्याचे ढीग साचले असून, या भागात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे येथून ये-जा करणार्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्यास ढीग साठल्यामुळे धोका उद्भवू शकतो याची जाणीव तरी संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना होणे आवश्यक आहे.
कचर्याचे ढीग साचलेला परिसर ढवर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो, असे आक्षी ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. तर, ढवर ग्रामपंचायतीनेही आपली हद्द नाकारलेली नाही. त्यावर उपाय म्हणून अनेकदा दोन्ही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून कचरा उचलण्यात आला असून, त्यानंतर परिसर स्वच्छ यासाठी याठिकाणी ग्रीन नेट लावण्यात आल्याचे सांगितले आहे. परंतु, स्वच्छता मोहीम राबवित असताना वनविभागाकडून कांदळवनांचे कारण पुढे करुन आक्षेप घेण्यात येत असल्याचा आरोप दोन्ही ग्रामपंचातींच्या सरपंचांकडून करण्यात आला आहे. तर, याठिकाणी असलेला कचरा जेसीबी लावून कांदळवनात ढकलण्यात येत असून, त्याला आमचा विरोध असल्याचे अलिबाग तालुका वनविभागाचे मुख्य अधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले.
कचरा पडलेली हद्द ग्रामपंचायतीची नसून, वनविभागाची आहे. परंतु, वेळोवेळी आक्षी आणि ढवर ग्रामपंचायत आक्षी पुलाच्या खाली टाकण्यात येणार्या कचर्याची साफसफाई करीत आहे. वनविभाग आपली हद्द आहे सांगते, परंतु स्वच्छतेसाठी काहीच उपाययोजना करीत नाही, असा आरोप दोन्ही ग्रामपंचायतींकडून करण्यात येत आहे. परंतु, वनविभागाने या आरोपात तथ्य नसल्याचे सांगितले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि वनविभाग यांच्या वादात मात्र कचरा आहे तिथेच पडून असून, रोज कचर्याच्या ढिगात वाढ होत आहे.
गुरुवार उजाडलाच नाही
कचराप्रश्नी अलिबाग तालुका वनविभागाचे मुख्य अधिकारी श्री. पाटील यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी दोन्ही ग्रामपंचायतींनी केलेले आरोप खोडून काढले. या ठिकाणी जेसीबी लावून कचरा उचलला नसून, तो कांदळवनात ढकलला जातो, असा आरोप केला आहे. कचरा उचलण्यास आमचा विरोध नसून, तो कांदळवनात ढकलू नये, असे सांगितले. परंतु, कचरा उचलण्यासाठी काय करणार, याबाबत ठोस आश्वासन दिले नाही. याबाबत मी घटनास्थळावर आमच्या अधिकार्यांना गुरुवारी पाठवतो, म्हणजे खरे काय ते समजेल, असे त्यांनी सांगितले. परंतु, त्यांचा गुरुवार काही नाही.
कांदळवनात गुरेढोरे गेली की त्यांना अडवता, चिंबोर्यांना कोण गेले तर त्यांना अडवता, मग कचरा कोण टाकतय हे पाहण्यासाठी वनविभागाने आपल्या अधिकारी, कर्मचार्यांना त्याठिकाणी पहार्यावर ठेवायला हवे.
विश्वनाथ गावंड, ढवर सरपंच
परिसरात भरणार्या आठवडा बाजारातील अनेक व्यावसायिक याठिकाणी कचरा टाकत आहेत, असे निदर्शनास येत आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरातील स्थानिक व कॉटेजवालेही येथे कचरा टाकून सूचना फलकालाच हरताळ फासत आहेत. तरी, कचर्याची योग्य विल्हेवाट लावावी, रस्त्यावर कचरा टाकू नये.
संतोष राऊळ, स्थानिक ग्रामस्थ