तातडीने खड्डे बुजवा : मिनिडोअर-रिक्षा चालकांची मागणी
| कोर्लई | वार्ताहर |
साळाव-मुरुड रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून विहूर पूल, नवीन मजगाव, उसरोली फाटा, नांदगाव मच्छिमार्केट, स्टेट बँक, वाघोबा मंदिर, दांडा, काशिद बीच, यू-टर्न, बोर्ली स्टॅण्ड, कोर्लई, साळाव पूल-चेकपोस्ट नाका रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. यामुळे पर्यटक, वाहनचालक व प्रवासीवर्ग हैराण झाला असून, तातडीने खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी मिनिडोअर-रिक्षा चालक व प्रवासी वर्गातून जोर धरीत आहे.
खड्ड्यांच्या त्रासानंतर गेल्या अनेक दिवसांपासून साळाव – मुरुड रस्त्यावर अनेक ठिकाणी असलेल्या झाडाझुडुपांचा विळखा तसेच काही ठिकाणी खाली आलेल्या झाडांच्या फांद्या वाहतुकीला अडथळा ठरत असून विहूर,मोरे ते मजगांव, उसरोली फाटा, नांदगाव बाजार ते बाजारपेठ,वाघेश्वर नगर, दांडा, सर्वे, काशिद, काशिद यु-टर्न, बारशिव, बोर्ली स्टँड, कोर्लई भागात रस्त्यावर खड्ड्यांमुळे प्रवासी व वाहनचालक यांना त्रास व हाल सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबाबत नाराजीचा सूर दिसून येत असून, रस्त्याच्या साईडपट्ट्या साफ करण्याची मागणी केली जात आहे तसेच काही ठिकाणी रस्त्यावर झाडांच्या फांद्या वाहतुकीला अडथळा ठरत आहे. मुरुड-जंजिरा किल्ला, काशिद बीच पर्यटनात याठिकाणी पर्यटकांची रेलचेल असते तर शनिवार रविवार रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा असून, वेळप्रसंगी ट्रॅफिक जॅम ला सामोरे जावे लागते आहे.
साळाव-मुरुड रस्त्याच्या दुरवस्थेबाबत वेळोवेळी वृत्तपत्रातून देण्यात आलेले वृत्त सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षीय संघटनांची मागणी लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या रस्त्यावर विहूर, मोरे, सर्वे भागात डांबरीकरण करण्यात आले आहे. यात विहूर पेट्रोल पंप ते मोरे नवीन मजगांव दरम्यान रस्त्यावरील डांबरीकरण उखडल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने यात तातडीने लक्ष पुरवून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी पर्यटक, मिनिडोअर-रिक्षा चालक व प्रवासीवर्गातून जोर धरीत आहे.