। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत विधानसभा मतदारसंघात सुरू असलेली झुंडशाहीला आळा घालण्यासाठी आणि मतदारसंघात शांतता कायम ठेवण्यासाठी मला आमदार व्हायचे आहे, असे आवाहन भाजपचे कार्यकर्ते किरण ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित सभेत बोलताना केले. किरण ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष तसेच अपक्ष म्हणून नामांकन अर्ज दाखल केला.
भाजपचे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्यावतीने कर्जत येथील रॉयल गार्डन सभागृहात सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी किरण ठाकरे यांच्यासह भाजपाचे नेरळ शहर अध्यक्ष संभाजी गरुड, नेरळ जिल्हा परिषद गट अध्यक्ष संतोष धुळे, अॅड. ॠषिकेश जोशी, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन म्हसकर, प्रज्ञेश खेडकर, बळवंत घुमरे, बिनिता घुमरे, संजय कराळे, संतोष म्हसकर, श्रद्धा कराळे, मिनेश मसणे, पंढरी हजारे, सुनील आंग्रे, रामदास घरत आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. ॠषिकेश जोशी यांनी आम्ही सर्व पक्षाच्या अप्रत्यक्ष पाठिंब्याने निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आज आम्हाला आशीर्वाद द्यायला एकही गुरू वरिष्ठ आशीर्वाद द्यायला आला नाही.पण मतदारसंघातील दहा टक्के जनता किरण ठाकरे यांच्यासोबत आहे हे ही गर्दी पाहून दिसून येते.त्याचवेळी किरण ठाकरे यांच्यासोबत कोणी नाही हे ही जनता दाखवून देत आहे.मागील निवडणुकीत भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या बळावर निवडून आले असून निवडून आल्यानंतर विद्यमान आमदार यांनी भाजप कार्यकर्त्यांना दूजाभाव तसेच दुर्लक्ष करण्याचे काम केले. आमच्या अनेक कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करण्याचे काम केले असा आरोप विद्यमान आमदार यांचे नाव न घेता केला.
मतदारसंघाची सुरक्षा वार्यावर
मतदारसंघात महिला सुरक्षित नाहीत. शेतकर्यांच्या जमिनी काढल्या जात आहे. तरुणांचे हातपाय तोडले जात आहेत. तरुण बेरोजगार आहेत. तरुणांना पक्षात या असे सांगून नोकर्या देण्याची खोटी आश्वासने दिली जात आहेत. या मतदारसंघात झुंडशाही सुरू असून, एक म्हणतो घरात घुसून मारेन, एक म्हणतो तुझ्या गावात येऊन मारेन. मला संधी मिळाली तर महिलांच्या डोक्यावरील हंडा हातात आणायचा आहे. मला बंगले बांधायचे नाहीत, कोणाचे घरातदेखील घुसणार नाही. मात्र, सर्वसामान्य लोकांचे दुःख समजून घेऊन कर्जत मतदारसंघात शांतता प्रस्थापित ठेवण्यासाठी निवडणुकीला सामोरे जात असल्याचे उमेदवार किरण ठाकरे यांनी सांगितले.