किरवलीत तीन दिवस वीज गायब

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत शहारजवळ असलेल्या किरवली गावात गेल्या तीन दिवसापासून वीज खंडित झाली आहे. बंद पडलेले वीज रोहित्र बदलून देण्यात यावे यासाठी किरवली ग्रामस्थ यांनी सलग तिसर्‍या दिवशी महावितरण कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली. मात्र महावितरण कंपनीकडून सलग तिसर्‍या दिवशी देखील केवळ आश्‍वासने दिली आहेत. दरम्यान, ग्रामस्थांच्या संतापाचा कडेलोट झाला असून ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

किरवली गावात 250 घरे असून 1500 लोकवस्ती आहेत. एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या गावात महावितरण कंपनीकडून करण्यात आलेले नियोजन चुकले असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ यांच्याकडून सातत्याने केला जात असतो. एवढी मोठी लोकसंख्या असून देखील किरवली गावात महावितरण कडून 100 केव्हीए क्षमतेचे वीज रोहित्र आहे.त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांकडून सातत्याने दोन ठिकाणी 100 केव्हीए क्षमतेची वीज रोहित्र बसविण्यात यावी अशी मागणी केली आहे. ग्रामस्थांनी 100 केव्हीए क्षमतेची दोन वीज रोहित्र बसवून देण्याची कार्यवाही महावितरण कंपनी करीत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आता महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.

Exit mobile version