। मुंबई । वृत्तसंस्था ।
भाजप नेते किरीट सोमय्यांच्या कथित व्हीडीओ क्लिपचे पडसाद मंगळवारी विधिमंडळात जोरदार उमटले. यावरुन सभागृहात प्रचंड गदारोळ करीत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. तरीही विरोधकांनी याच मुद्यावर जोरदार घोषणाबाजी करीत आपला संताप व्यक्त केला.
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला असून हा मुद्दा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला. या प्रकरणाची सखोल आणि उच्च स्तरावर चौकशी होईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते म्हणाले जो विषय मांडला आहे तो गंभीर आहे. राजकारणात अनेक प्रसंग येत असतात. माझं म्हणणं आहे की, माझ्याकडे पुरावे द्या. कोणालाही पाठिशी घालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कुठलंही प्रकरण दाबलं जाणार नाही. सखोल आणि वरिष्ठ स्तरावरील चौकशी केली जाईल.असे त्यांनी जाहीर केले.
माता भगिनींना त्रास: दानवे
विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, काही लोक ईडी सीबीआयच्या माध्यमातून विरोधी पक्षांतील नेत्यांना भीती दाखवतात आणि दुसरीकडे आपल्या केंद्रीय यंत्रणेत ओळखी असून महिलांशी संपर्क करत असल्याचं समोर आलं असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. महामंडळात नियुक्त्या देतो, विधानपरिषदेवर घेतो असं सांगितलं जातं आणि एक्स्टॉर्शन केलं जातं. असच अनेक नेत्यांना देखील ईडी, सीबीआयचे धाक दाखवून पैसै मागितले जातात. अनेक महिलांनी मला येऊन माहिती दिली असल्याचा दावाही दानवेनी केला. 8 तासांचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. हा व्यक्ती एक्स्टॉर्शन करत आहे. असे उपरे दलाल महाराष्ट्रात येतात आणि महिलांना त्रास देतात. किरीट सोमय्या त्यांचं नाव आहे. माता भगिनींना त्रास देणाऱ्या किरीट सोमय्यांना सरकार सुरक्षा देणार का? मी त्याचा पेन ड्राईव्ह आपल्याला देतो. हा माणूस पुन्हा मुंबई पोलिसांना पत्र लिहितो आणि चौकशी करा, असा आरोपही सोमय्यांनी केला.
सोमय्या यांची सुरक्षा काढा: परब
ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांची सुरक्षा काढण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, एका चॅनलवर भाजपच्या माझी खासदारांचा व्हिडीओ समोर आला आहे. अंबादास दानवे यांनी सांगितलं की, बदनामी काय असते तर मी त्याचा साक्षीदार आहे. मुलाबाळांना केंद्रीय यंत्रणा बोलावते आणि घाणेरडे प्रश्न विचारते. यामुळे प्रचंड बदनामी होत असते. ज्या खासदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्याने अनेकांचे आयुष्य बदनाम केले आहेत. माझी मागणी आहे की ईडी, सीबीआय नको थेट रॉची चौकशी मागे लावा. त्यांनी आज जे पत्र दिलं आहे त्यामध्ये त्यांनी हा व्हिडीओ खोटा आहे असं कुठेही म्हटलं नाही. त्यांनी म्हटलं आहे की, मी कुणावर अत्याचार केला नाही. याचा अर्थ हा व्हिडीओ खरा आहे. तात्काळ गृहमंत्र्यांनी किरीट सोमय्या यांची सुरक्षा काढावी, अशी मागणीही परब यांनी केली.
या मुद्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. अखेर फडणवीस यांनी सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे जाहीर केले. यासाठी आवश्यक ते पुरावे सादर करावेत, अशी सुचनाही त्यांनी केली. तसेच, ज्या महिलेचा यामध्ये समावेश आहे तिचीही चौकशी केली जाईल. मात्र, तिचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे जाहीर केले.