घटना तज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांचे प्रतिपादन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुख्य राजकीय पक्ष वेगळा आणि विधानसभा गट वेगळा असे घटनेत लिहिले असताना निवडणूक आयोगाने शिंदे गटाकडे अधिक संख्या असल्याने शिंदे गटाला शिवसेना पक्ष देणे हे चुकीचे आहे. याबाबत सर्वोच्च न्यायलयाने ताशेरे ओढले आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. राजकीय पक्ष हा मुख्य असून तो तोडू शकत नाही आणि त्याच्याकडे संख्या किती आहे हे निवडणूक आयोगाने पाहिलेले नाही आहे. निवडणूक आयोग कोणाच्या दबावाखाली आहे हे मी सांगू शकत नाही, असे प्रतिपादन घटनातज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी केले आहे. देशात पंतप्रधान लोकशाही सुरू असल्याचेही प्रा. बापट यांनी म्हटले आहे.
घटनातज्ञ प्रा. उल्हास बापट याचे भारतीय राज्यघटना आणि संसदीय लोकशाही या विषयावर अलिबाग प्रेस असोसिएशनच्या माध्यमातून आदर्श भवनात व्याख्यान आयोजित केले होते. प्रा. उल्हास बापट यांनी यावेळी राज्यात बदललेल्या राजकीय परिस्थिती, राज्यघटना आणि बदललेली संसदीय लोकशाहीबाबत आपले मत उपस्थितांसमोर मांडले. या व्याख्यानाला अलिबागमधील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी विसरलेल्या प्रश्नांना घटनातज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी समर्पक उत्तरे दिली.
संसदीय लोकशाही बाबत प्रा. उल्हास बापट यांनी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यावेळी विविध उदाहरणेही त्यांनी दिली. देशात पंतप्रधान लोकशाही कशी निर्माण झाली याची माहिती उपस्थितांना सांगितली. शिवसेना पक्ष बाबत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचेही त्यांनी सागितले. इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांचे सरकार जनतेने उलथून लावले असल्याचेही त्यांनी सांगितले. घटना बदल बाबतही प्रा. बापट यांनी आपले मत यावेळी व्यक्त केले. भारतात लोकशाही भक्कम असल्याचे मत प्रा. बापट यांनी मांडले आहे.