किरवली गावातील नळपाणी योजना बंद

ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ
। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत मधील किरवली गावातील नळपणी योजना जुलै 2021 पासून बंद आहे. त्यामुळे किरवली गावातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गावात रस्त्यांवर पाणीच पाणी आणि ओला झालेला रस्ता यामुळे गावातील महिलांनी ग्रामपंचायतला जाब विचारण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय गाठले.
कर्जत शहरापासून अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या किरवली ग्रामपंचायत मधील किरवली गावाची नळपाणी योजना बंद आहे. उल्हासनदीवरून पाणी उचलून गावात आणण्यात आले आहे. 17 वर्षांपूर्वी ही नळपाणी योजना करण्यात आली होती आणि या नळपाणी योजनेची उल्हासनदीवर चेडोबा मंदिराच्या मागे असलेली विहीर जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये कोसळली आणि त्यावेळी विहिरीच्या बाहेर असलेली वीज पंप देखील विहिरीत कोसळला होता. त्यामुळे पावसाळ्यापासून किरवली गावाची नळपाणी योजना बंद आहे. किरवली गावात पिण्याचे पाण्यासाठी खासगी बोअरवेल असून त्यांचा फायदा ठराविक ग्रामस्थांना होत आहे.
मात्र निम्म्या ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांना विकत पाणी घ्यावे लागते. त्यासाठी गावात काही खासगी ट्रँकर पाणी विकण्यासाठी येत असतात. मात्र रस्त्यात ट्रँकर उभे करून पाणी दिले जाते आणि त्यामुळे ट्रँकर मधील अर्धे पाणी रस्त्यावर वाहून जात असते. त्याचा परिणाम गावातील सर्व सतत चिखलमय झालेले असतात.
गावात पिण्याचे पाणी नाही आणि त्याचवेळी विकत पाणी घेत असताना त्यातील अर्धे पाणी रस्त्यावर पडत असल्याने रस्त्यांवर होणारा चिखल याकडे देखील ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नाहीत. ही नेहमीची समस्या बनल्याने किरवली ग्रामस्थांनी किरवली गावातून देऊळवाडी येथे असलेले ग्रामपंचायत कार्यालय गाठले. त्यावेळी सरपंच संतोष सांबरी यांनी महिलांना ग्रामपंचायतकडून नळपाणी योजना कार्यन्वित करण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
त्यावेळी महिलांनी 257 महिलांच्या सह्यांचे निवेदन ग्रामपंचायतला दिले. ग्रामपंचायतने 15 दिवसात नळपाणी योजना सुरु होईल असे आश्‍वासन दिले आहे.

Exit mobile version