मोकळ्या जागेची कमतरता, आभासी खेळाचा परिणाम
| गोवे-कोलाड | वार्ताहर |
मनोरंजनाची बदललेली साधने, तरुणांची बदललेल्या आवडी निवडी, शहरातील हरवलेली मोकळी मैदाने, भ्रमणध्वनी आदी कारणामुळे पतंगाची दुकाने ग्राहकांशिवाय ओस पडली आहेत. त्यामुळे बाजारात पतंग व मांजाच्या विक्रीत सुमारे 50 ते 60 टक्के घट झालेली दिसत आहे. आधी संगणक आणि त्यानंतर भ्रमणध्वनी जाळ्यात अडकलेली तरुणाई मैदानी खेळापेक्षा आभासी खेळात जास्त रमायला लागली आहे. त्यामुळे जुन्या काळातील अनेक खेळ काळाच्या ओघात लोप पावत आहेत. त्यात आता पतंगाचा समावेश झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पतंग व मांज्याच्या व्यावसायाला उतरती कळा लागल्याची खंत दुकानदारांकडून व्यक्त केली जात आहे. पूर्वी पतंग व्यावसाय जानेवारी महिन्यापासून तेजीत असायचे, या महिन्यात पतंग खरेदीसाठी गर्दी असायची यामुळे दुकानात दहा कामगार विक्री करण्यासाठी असायचे, त्यामुळे दहा कुटुंबांचा बेरोजगारीचा प्रश्न सहज सुटत होता. आता दुकानात अजिबात गर्दी दिसत नसल्यामुळे त्यामुळे दुकानदाराला कामगारांची संख्या ही कमी करावी लागली आहे. काही ठराविक पतंगप्रेमी सोडले तर तरुणाईने पतंग खरेदीसाठी पाठ फिरवली आहे. यामुळे पतंग व्यावसायाला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे.