| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यामध्ये गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शनिवारी 14 मे रोजी तीन तरुणांवर चाकूहल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच पूर्ववैमनस्यातून रविवारी किये गावातील तरुणावर चाकूहल्ला झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांमध्ये गोळीबार, चाकूहल्ला अशा घटना ताज्या असतानाच मात्र महाड तालुक्यातील किये गावात एका 45 वर्षीय इसमावर चाकू व हॉकीस्टिकने हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये काशिनाथ रमाकांत मालुसरे (45) रा. कीये, डांब्याची वाडी हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना प्रथमोपचारकरिता महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, काशिनाथ मालुसरे यांच्या गुडघ्याला व अंगठ्याचा जबर जखम झाल्यामुळे त्यांना मुंबई येथे अधिक उपचाराकरिता हलविण्यात आले आहे. रामदास तुकाराम सणस, जानू धोंडीराम मालुसरे, सागर बारकु मालुसरे अशी हल्ला करणाऱ्या आरोपींची नावे असून, आरोपी हल्ला करून फरार झाले आहेत. मागील भांडणाचा राग मनात धरून हा हल्ला झाल्याचे समजते. सदर आरोपींविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे हे करीत आहेत. एकाच आठवड्यामध्ये तीन-तीन गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.