कोहली, जडेजाचे पोलिसांना सॅल्यूट

| मुंबई | वृत्‍तसंस्था |

भारताचा महान फलंदाज विराट कोहली व अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांनी गुरुवारी मुंबईत पार पडलेल्या मिरवणुकीचे व्यवस्थापन अव्वल दर्जाचे असल्याकारणाने येथील पोलिसांचे कौतुक केले आहे. विश्वविजेत्यांचे अभिनंदन करण्यासाठी आलेल्या जनसागराला नियंत्रणात ठेवल्याबद्दल कोहली व जडेजा यांनी मुंबई पोलिसांची स्तुती केली. असंख्य क्रिकेटप्रेमींनी वानखेडे स्टेडियम गाठले होते. आपल्या लाडक्या खेळाडूंनी केलेल्या देदीप्यमान कामगिरीला मानवंदना देण्यासाठी हजारो क्रिकेटप्रेमी तिथे पोहोचले होते. अशा परिस्थितीत मुंबई पोलिसांनी येथील परिस्थिती नियंत्रणात ठेवली. विराट कोहलीने सोशल मीडियावर मुंबई पोलिसांचे आभार मानले. तो म्हणाला, भारतीय संघाच्या मिरवणुकीदरम्यान उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुंबई पोलिसांना धन्यवाद. तुमचे समर्पण आणि सेवा अत्यंत प्रशंसनीय आहे. रवींद्र जडेजाकडूनही सोशल मीडियावर आभार व्यक्त करण्यात आले.

Exit mobile version