| खांब-रोहा | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड ते तिसे गावच्या हद्दीपर्यंत पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे प्रवासी व वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दैनंदिन प्रवास करताना जीव अगदी मेटाकुटीला येत आहे. याशिवाय महामार्गावरील प्रवासही नकोसा होऊ लागला आहे. त्यामुळे गणपती सणापूर्वी या महामार्गावरील ठिकठिकाणी पडलेले खड्डे ठेकेदाराने बुजवून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळवून द्यावा, अशी मागणी या विभागातील राष्ट्रवादीचे नेते दगडू शिगवण यांनी केली आहे.
दरम्यान, कोलाड ते तिसे या भागात रस्ता एवढा खराब झाला आहे की, याचा त्रास परिसरातील नागरिकांना तसेच दैनंदिन प्रवास करणारे वाहनचालक व प्रवासी तसेच विद्यार्थीवर्गाला सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांच्या गंभीर समस्येबाबत खा. सुनील तटकरे, माजी पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांच्याकडे प्रश्न उपस्थित करण्याार असल्याचे दगडू शिगवण यांनी सांगितले.