शासनाच्या नाकर्तेपणाचा कोळी बांधवांना फटका

मासळी रस्त्यावर सुकविण्याची वेळ

| उरण | वार्ताहर |

कोळी बांधवांनी आपल्या परंपरागत व्यवसायाला पुनर्जीवित करून समुद्रात मिळालेल्या मासळीचे सुक्या मासळीत रूपांतरित करून तिच्या विक्रीचा व्यवसाय सुरू करून आपल्या कुटुंबाच्या संसाराला आधार दिला आहे. परंतु, शासनाच्या नाकर्तेपणामुळे कोळी बांधवांना चक्क रहदारीच्या रस्त्यावरच समुद्रातील ओळी मासळी वाळत घालण्याची वेळ आल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

उरण, पनवेल तालुक्यातील करंजा, मोरा, हनुमान कोळीवाडा, दिघोडे, कोप्रोली, कुंडेगाव व केळवणे ग्रामपंचायत हद्दीत कोळी समाजाची मोठी वस्ती आहे. या कोळी बांधवांना आपल्या उदरनिर्वाहासाठी शेती किंवा आणखी कोणतेही साधन नसल्याने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा मासेमारी करून करावा लागत आहे. परंतु, समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे खोल समुद्रात मासळी मिळणे कठीण झाले आहे. दुसर्‍याच्या बोटीवर काम करीत असल्याने या बांधवांना मजुरी मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे सुक्या मासळीचा व्यवसाय करण्याचा निर्णय गरीब कोळी कुटुंबातील सदस्यांनी घेतला आहे.

सदर गरीब कोळी कुटुंबातील सदस्य हे मुंबई, करंजा, मोरा व अलिबाग या ठिकाणावरुन मासेमारी बंदरातून ओली सुकट, ओल्या वाखट्या, बोंबील अशा विविध प्रकारची मासळी विकत आणतात. परंतु शासनाच्या मत्स्य विभागाच्या अधिकार्‍यांनी खाडीकिनारी किंवा गाव परिसरात ओली मासळी वाळत घालण्यासाठी ओट्यांची सुविधा उपलब्ध करून न दिल्याने तसेच काही गाव परिसरात ओट्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे (तकलादू) केल्याने सदर कोळी बांधवांना चक्क रस्त्याच्या कडेला मासळी उन्हात सुकवून तिचे सुक्या मासाळीत रूपांतर करावे लागत आहे, असे येथील कोळी बांधवांचे म्हणणे आहे.

शासनाच्या मत्स्य विभागाच्या अधिकार्‍यांनी उरण, पनवेल तालुक्यातील कोळी बांधवांसाठी सुकट, वाखट्या, बोंबील, टेंगली, शिंगाला ही मासळी वाळत घालण्यासाठी सुसज्ज अशा ओट्यांची उभारणी करुन देण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि गाव परिसरात निकृष्ट दर्जाच्या ओट्याच्या कामांची चौकशी करावी.

कांचन कोळी
Exit mobile version