कोळी बांधवांवर मत्स्यदुष्काळाचे सावट

एक महिना आधीच बोटी किनारी

| मुरुड जंजिरा | प्रतिनिधी |

कोकणातील मच्छिमार गेली 10 वर्षे सतत अवकाळी पाऊस, वादळीवारा, समुद्रात रासायनिक प्रदूषण व अनधिकृत एलइडीच्या साह्याने मासेमारीमुळे मत्सदुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. दिवसेंदिवस कोळी बांधवांचे जीवन व मासेमारी हा व्यवसाय धोकादायक बनत चालला आहे. कारखान्यांतील विषारी रसायनेमिश्रित सांडपाणी थेट समुद्रामध्ये सोडले जाते. त्यामुळे प्रदूषणाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे त्याचा माश्यांवर विपरीत परिणाम होऊन माशांचे उत्पादन होत नसल्याने दुष्काळ निर्माण झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मासेमारीचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे यावर्षी मुरुड परिसरातील कोळी बांधवानी एक महिना आधीच आपल्या बोटी किनारी ओढल्या आहेत.

कोळीबांधवांचे वर्षातून सहा हंगाम चांगल्या मासेमारीचे असतात. सर्वात प्रथम पावसाळ्यानंतर गणपतीमध्ये जी मासेमारी होते तो सर्वात मोठा हंगाम असतो. कारण पावसाळ्यातील तीन महिने प्रजनन काळ असतो. दरम्यान पावसाळी मासेमारी बंद असल्याने समुद्रात माश्यांची मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि महिनाभर चांगले उत्पादन मिळते, जे पूर्वी वर्षभर मिळत असे. परंतु आजकाल पावसाळ्यात मासेमारी बंद काळात देखील एलइडीचे लाईट वापरून अनधिकृत मासेमारी होत असल्याने पारंपरिक मच्छिमाराला प्रमुख हंगामात मासळी मिळत नाही. पुढील पाच हंगाम वातावरणातील बदलामुळे कसेबसे आपली उपजीविका भागवत असतात.

मुरुड शहराला मासेमारी जेट्टीनसल्याने बोटी वाळूत नांगराव्या लागतात आणि वाळूत होणाऱ्या अपघातामुळे होणारे नुकसान कोळी बांधवांना सहन करावे लागते. मुरुडला बोटींची तातडीची दुरुस्तीची सोय नसल्याने या काळात बोटी किनाऱ्यावर ओढून दुरुस्तीची कामे करावी लागतात. बोट किनारी लागली की कोळी बांधव आपल्या उपजीविकेसाठी किनाऱ्यावर रापण करून म्हणजे 8 ते 10 कोळीबांधव जाळी घेऊन समुद्रात जाळी टाकतात व काही वेळाने ती ओढत किनारी आणतात. त्यात मिळणाऱ्या माश्यांवर पुढील 3 महिने पोट भरावे लागते. ज्यांना समुद्रातील कष्ट जमत नाही ते बांधव व महिला पोटासाठी रोजावर कामाला जात असतात. या कोळी बांधवांच्या विस्कळीत जीवनाला जबाबदार कोण? असा प्रश्न सर्व स्थरांतून जोर धरत आहे.

Exit mobile version