मुरुड नगरपरिषदेसमोर कोळी समाजाचे ठिय्या आंदोलन

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

मुरुड शहरातील जुना पाडा महादेव कोळी समाज मुरुड सिटी सर्वे नंबर 65/2 या कोळी लोकांचे बिन आकारी होळीचे मैदान असून, येथे मुरुड नगरपरिषदेचे गटाराचे बांधकाम सुरु असतानाच काळ भैरव देवस्थान मंदिर ट्रस्ट भंडारी समाज मुरुड यांनी गटाराच्या मूळ बांधकामात अनधिकृतपणे लोखंडी खांब उभे केले आहेत. असे केल्याने मुरुड भंडारी समाजाने त्यांचा कोणताही संबंध नसताना आमच्या समाजाच्या होळीच्या ठिकाणाला सीमांकित करण्याचा प्रयत्न केला आहे. सदरील लोखंडी पोल तातडीने काढून टाका अन्यथा 5 जानेवारी रोजी मुरुड नगरपरिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी मुरुड नगरपरिषद याना यावेळी देण्यात आला आहे.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, काळभैरव देवस्थान मंदिर ट्रस्ट भंडारी समाज मुरुड यांचा या जागेशी काडीमात्र संबंध नसलेल्या मौजे मुरुड, स.नं. 65/2 या कोळी लोकांच्या बिनआकारी होळीचे मैदान मुरुड अशी शासकीय दप्तरी सातबार्‍यावर नोंद असलेल्या कोळी लोकांच्या जागेवर लोखंडी खांब उभे करुन, आता समाजाची शतकांपुर्वीपासुन लागणार्‍या होळीचे स्थान स्थलांतरीत करण्याची मागणी करुन सरळ सरळ सदर जागा हडप करण्याचा डाव काळभैरव देवस्थान मंदिर ट्रस्ट भंडारी समाज मुरुड यांचा असल्याचा आरोप या निवेदनातून कोळी समाजाने केला आहे. अडीच वर्ष अधिक काळापासून नगरपरिषदेकडे वारंवार अनेक तक्रार अर्ज व निवेदन करुनसुध्दा प्रत्यक्षरित्या लोखंडी खांब हे या जागेतून हटवण्यात आले नाही.

मुरुड नगरपरिषदेकडून सदर लोखंडी खांब काढून टाकण्यासाठी ठोस प्रकारची कारवाई व्हावी यासाठी कोळी समाज येत्या 5 जानेवारी पासून मुरुड नगरपरिषदेवर ठिय्या आंदोलन नगर परिषद प्रांगणात सुरु करणार आहे. नगरपरिषदेच्या उदासीन धोरणामुळे लोखंडी पोल काढले जात नाही. यावर कोळी समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. सदरील निवेदन मुख्याधिकारी मुरुड नगरपरिषदेसह जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार मुरुड, मुरुड पोलीस निरीक्षक याना देण्यात आलेल्या आहेत.

Exit mobile version