रसेल-रिंकूची तुफानी खेळी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोलकात्याने थरारक विजय मिळवला. अखेरच्या षटकात सहा धावांची गरज असताना अर्शदीप याने भेदक मारा केला. पण रिंकू सिंहने अखेरच्या चेंडूवर षटकार लगावत कोलकात्याला विजय मिळवून दिला. दोन चेंडूत दोन धावांची गरज असताना आंद्रे रसेल धावबाद झाला. त्यामुळे रिंकूवर दबाव होता. पण रिंकूने दबाव न घेता अर्शदीपच्या अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत पंजाबला पराभवाची चव चाखायला लावली.
शिखर धवनच्या अर्धशतकाच्या बळावर पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 179 धावांपर्यंत मजल मारली होती. पंजाबने दिलेल्या 180 धावांचे आव्हान कोलकात्याने अखेरच्या चेंडूवर पाच विकेट राखून पार केले. कोलकात्याकडून कर्णधार नीतीश राणा याने अर्धशतकी खेळी केली. तर आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह यांनी वादळी फलंदाजी करत कोलकात्याला विजय मिळवून दिला.
पंजाबने दिलेले 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात अश्वासक झाली. गुरबाज आणि जेसन रॉय यांनी दमदार फलंदाजी केली. पण गुरबाजला बाद करत एलिसने इम्पॅक्ट पाडला. गुरबाज बाद झाल्यानंतर कर्णधार नीतीश राणा याने जेसन रॉय याच्यासोबत कोलकात्याचा डाव सावरला. जेसन रॉय याला 38 धावांवर हरप्रीत ब्रार याने तंबूत पाठवले. रॉय बाद झाल्यानंतर वेकंटेश अय्यर यालाही मोठी खेळी करता आली नाही. चहरने अय्यरला 11 धावांवर तंबूत पाठवले. अय्यर बाद झाल्यानंतर कोलकात्याचा डाव ढेपाळला. नीतीश राणाही बाद झाला.
नीतीश राणा याने कर्णधाराला साजेशी खेळी केली. नीतीश राणा याने 38 चेंडूत 51 धावांचे योगदान दिले. राणा बाद झाल्यानंतर आंद्रे रसले याने सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली. आंद्रे रसेल याने रिंकूच्या साथीने कोलकात्याला विजायाकडे नेले. अखेरच्या षटकात दोन चेंडूंवर दोन धावांची गरज असताना रसेल धावबाद झाला. रसेल याने 23 चेंडूंत तीन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 42 धावांचे योगदान दिले. रसेल बाद झाल्यानंतर रिंकूने चौकार लगावत कोलकात्याला विजय मिळवून दिला. रिंकूने 10 चेंडूंत एक षटकार आणि दोन चौकार लगावत विजयी खेळी केली. रिंकू सिंह पुन्हा एकदा कोलकात्याच्या मदतीला धावून आला. पंजाबकडून राहुल चहरने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. त्याशिवाय नॅथन एलिस आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. इतर गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही.