कोंढरीपाडा ग्रामस्थांचा लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार

| उरण | वार्ताहर |

मावळ लोकसभा मतदार संघाची निवडणूक 13 मे रोजी आहे. यात पुणे जिल्हा व रायगड जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश आहे.निवडणुकीची तारीख जवळ आल्याने दिवसेंदिवस राजकीय वातावरण अधिकच तापू लागले आहे. त्यातच मावळ लोकसभा मतदार संघातील उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील कोंढरीपाडा येथील ग्रामस्थांनी आपल्या आराध्य ग्रामदैवत श्री हनुमंताच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला त्याने केलेल्या गैरकृत्याबद्धल एक वर्ष पूर्ण झाले आहे तरी शासन होत नसल्याने लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.

गेल्या एक वर्षापासून आगरी कोंढरी ग्रामस्थ हे गावातील ग्रामदैवत श्री हनुमंताच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला त्याने केलेल्या गैरकृत्याबद्धल त्याला शासन व्हावे यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही शासकीय आणि राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हेगार हा गावात मोकाट फिरत आहे. आगरी कोंढरी पाड्यात असणाऱ्या श्री हनुमंताच्या मूर्तीची विटंबना 6 मे रोजी गावात राहणाऱ्या समाजकंटकाने केली होती. या इसमावर उरण येथील पोलीस ठाण्यात तक्रारदेखील नोंदविण्यात आलेली आहे. गावकऱ्यांना कायद्यावर व शासकीय पोलीस यंत्रणेवर विश्वास होता की ग्रामदेवतेच्या झालेल्या विटंबनेला शासनातर्फे अथवा न्यायालयामार्फत योग्य ती फौजदारी कारवाई होईल अशी आशा होती. पोकळ आश्वासनाद्वारे आणि राजकीय हस्तक्षेपामुळे कोणतीही कारवाई न होता दिरंगाई होत असल्याने ग्रामस्थांनी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version