ग्रामदत्तक योजनेत कोंडीवली गाव प्रथम

। खेड। प्रतिनिधी ।
रत्नागिरी जिल्हा पोलीस दल यांचेद्वारा आयोजित ग्रामदत्तक योजनेत तालुक्यातील कोंडीवली या गावाने लक्षणीय कामगिरी करत प्रथम क्रमांकाचे यश संपादित केले आहे. यामुळे आयोेजित कार्यक्रमात पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते सरपंच महंमद हुर्जुक व ग्रामसेवक एस. वाय. फरांदे यांना पारितोषिक व सन्मान चिन्ह देऊन कोंडीवली ग्रामपंचायतीचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला आहे.
कोव्हिड-19च्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस दलातर्फे ग्रामदत्तक योजना या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी कोंडीवली हे गाव दत्तक घेतले होते. या स्पर्धेंतर्गत कोव्हिड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी समाजमानस जागृत करणे तथा आरोग्य निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करणे ही कामे ग्रामसेवक एस. वाय. फरांदे यांनी पोलीस दलाच्या साथीने सुयोग्यरित्या केली.
ग्रामदत्तक योजना या स्पर्धेच्याद्वारे पोलीस दलाला करण्यात आलेले सहाय्य आणि आपल्या प्रशासकीय जबाबदारीचे विहित पद्धतीने निर्वहन यामुळे कोंडीवली ग्रामपंचायतीस गौरविण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, पोलीस तथा महसूल प्रशासन, नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version