| रायगड | प्रतिनिधी |
मुबलक सूर्यप्रकाश, वेगवान सागरी वारे आणि अथांग सागरी मार्ग या कोकणाच्या नैसर्गिक संपत्तीच्या बळावर आता कोकण किनारपट्टी राज्याच्या हरित ऊर्जेच्या विकासाचा मुख्य कणा ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशन आणि महाराष्ट्राच्या हरित ऊर्जा धोरण 2023 यांच्या माध्यमातून कोकण परिसराला ‘ग्रीन एनर्जी हब’ म्हणून विकसित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना पुढे येत आहे. या हरित ऊर्जा प्रकल्पांमुळे कोकणात 50 हजारांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार; निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे औद्योगिक विकासासोबतच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधींचे दालन खुले होणार आहे.
आगामी तीन ते पाच वर्षांच्या कालावधीत पायाभूत सुविधा आणि विविध ऊर्जा प्रकल्पांची उभारणी होणार आहे. या टप्प्यात इंजिनिअर्स, वेल्डर्स, मेकॅनिक्स, तंत्रज्ञ, चालक तसेच विविध कुशल-अर्धकुशल मनुष्यबळासाठी; 20 हजारांहून अधिक प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर केमिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स, तंत्रज्ञ, ऑपरेटर आणि देखभाल विभागातील सुमारे 2 हजार कर्मचाऱ्यांना स्थायी रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया आणि अक्षय ऊर्जेशी संबंधित तांत्रिक कौशल्यांना त्यामुळे मोठी मागणी निर्माण होणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या हरित ऊर्जा धोरणांतर्गत कोकणात तब्बल 2.76 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या गुंतवणुकीमुळे राज्यभरात सुमारे 64 हजारांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. तसेच 2030 पर्यंत दरवर्षी 5 लाख टन ग्रीन हायड्रोजन उत्पादनाचे धोरणात्मक उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू आहे. मोठ्या गुंतवणुकीसोबत स्थानिक कौशल्यविकासाला प्राधान्य मिळाल्यास कोकणातील तरुणांना नवी दिशा मिळणार आहे.
प्रस्तावित प्रकल्प
रत्नागिरी : ग्रीन हायड्रोजन व अमोनिया प्लांट
रायगड : ग्रीन हायड्रोजन पोर्ट
हब दिघी पोर्ट
सिंधुदुर्ग : सागरी वारे व सौर
ऊर्जा प्रकल्प







