शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची उपस्थिती
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अंधश्रद्धा, अन्याय आणि सामाजिक विषमतेविरोधात विचारांची मशाल पेटवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने रविवारी (दि.12) नव्या पनवेल येथे कोकण विभागीय सत्यशोधक परिषद आयोजित करण्यात आली आहे.
कोकणात विवेकवाद, समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारी कोकण विभागीय सत्यशोधक परिषद रविवारी (दि. 12) नव्या पनवेल येथे पार पडत आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रायगड जिल्हा यांच्या वतीने आयोजित या परिषदेत विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, विचारांची समृद्ध देवाणघेवाण होणार आहे.
के.आ. बांठिया माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. परिषदेचे उद्घाटन खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी अंनिसचे राज्याध्यक्ष माधव बावगे असतील. शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील, काँग्रेस प्रदेश सचिव श्रुती म्हात्रे तसेच सुरेखा दळवी यांची प्रमुख उपस्थिती या परिषदेला लाभणार आहे.
परिषदेतील परिसंवाद सत्रात ‘ज्योतिबा फुले ते दि. बा. पाटील : वारसा सत्यशोधनाचा’ या विषयावर विविध मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, शिवराज्य प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष ॲड. रोशन पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार दिपक म्हात्रे यांची भाषणे हे या सत्राचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
दुपारनंतर ‘सत्यशोधक विचार व अंनिस’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून, निवृत्त आयएएस अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, सुशिला मुंडे आणि संजय बनसोडे यांचे मार्गदर्शन उपस्थितांना मिळणार आहे. या सत्रातून समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन, समता आणि स्वाभिमान यांचा संदेश दिला जाणार आहे.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षाची सुरुवात, दि. बा. पाटील यांच्या जन्मशताब्दीचा समारोप आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दीचे औचित्य साधत ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे ही परिषद केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता सामाजिक परिवर्तनाचा निर्धार करणारे व्यासपीठ ठरणार आहे.
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दि. बा. पाटील यांच्या समतावादी व परिवर्तनवादी विचारांचा संगम घडवत नव्या पिढीमध्ये जागृती निर्माण करण्याचा या परिषदेचा उद्देश आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन आणि समतेची जाणीव रुजवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
