नव्या पिढीसाठी जागृतीचा निर्धार; शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अंधश्रद्धा, अन्याय आणि सामाजिक विषमतेविरोधात विचारांचा आवाज बुलंद होणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रायगड जिल्हा यांच्या वतीने कोकण विभागीय सत्यशोधक परिषद रविवारी (दि.12) नवीन पनवेल येथे आयोजित करण्यात आली आहे.
सेक्टर-18 मधील के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालय हॉलमध्ये सकाळी 10 ते सायं. 4 या वेळेत होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन खा. सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या हस्ते होणार असून, हे सत्र नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी ठरणार आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी महा. अंनिसचे राज्य अध्यक्ष माधव बावगे असून शेकापचे सरचिटणीस माजी आ. जयंत पाटील, काँग्रेस प्रदेश सचिव श्रृती म्हात्रे, सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दळवी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
परिषदेतील परिसंवाद सत्रात ज्योतिबा फुले ते दि. बा. पाटील वारसा सत्यशोधनाचा या विषयावर विविध मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, शिवराज्य प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष ॲड. रोशन पाटील आणि जेष्ठ पत्रकार दिपक म्हात्रे यांचे भाषण या सत्राचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
दुपारनंतर ‘सत्यशोधक विचार व अंनिस’ या विषयावर चर्चासत्र होणार असून, निवृत्त आयएएस अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, सुशिला मुंडे आणि संजय बनसोडे यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या सत्रातून समता, सामाजिक न्याय आणि विवेकवादाचा संदेश दिला जाणार आहे.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षाची सुरुवात, दि. बा. पाटील यांच्या जन्मशताब्दीचा समारोप आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दीचे औचित्य साधत ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे ही परिषद केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता सामाजिक परिवर्तनाचा निर्धार करणारे व्यासपीठ ठरणार आहे.
महात्मा फुले यांच्या समतावादी विचारांचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीमय लढ्याचा आणि दि.बा. पाटील यांच्या संघर्षमय कार्याचा संगम घडवून समाजात न्याय, समता आणि स्वाभिमान यांची ज्योत अधिक तेजाने पेटविण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांचा समाज परिवर्तनाचा वारसा या सत्यशोधन परिषदेतून पुढल्या पिढीपर्यंत घेऊन जाण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन, समता आणि स्वाभिमान रुजवण्यासाठी सर्व नागरिकांनी या परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे करण्यात आले आहे.






