ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे वाहतूक पाच तास ठप्प

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
मडगाव-मुंबई कोकण कन्या एक्स्प्रेस वीर स्थानकावर रखडली असल्याने याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने वीर स्थानकानजवळ एक्स्प्रेस बंद पडली आहे. शुक्रवारी पहाटे हा प्रकार घडला. सकाळी चार वाजल्यापासून कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल झाले.

मुंबईकडे येणारी कोकण कन्या एक्स्प्रेस रात्री 3 वाजून 11 मिनिटांनी वीर रेल्वे स्थानकाजवळ बंद पडली. एक्स्प्रेस बंद पडली असल्याने याचा परिणाम वाहतुकीवर झाला. एक्स्प्रेसमधील प्रवासी पाच तासांहून अधिक खोळंबले होते. अखेर पाच तासांनी बिघाड दुरुस्त करण्यास रेल्वे प्रशासनाला यश आले. त्यानंतर कोकणकन्या एक्स्प्रेस मार्गस्थ झाली. बिघाड झालेली रेल्वे मार्गस्थ होऊनही कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या दोन ते साडेतीन तास उशिराने धावत आहेत. कोकणकन्या, तुतारी, मंगलोर एक्स्प्रेस, मडगांव एक्स्प्रेस अशा अनेक गाड्या उशिराने धावत आहेत.

कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीतपणाचा त्रास रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतांना झाला. राज्याचे उद्योगमंत्री सामंत शुक्रवारी रत्नागिरी दौरा करणार होते, परंतु वाहतूक सुरळीत नसल्याने सामंत यांनी पुन्हा मुंबई गाठली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही वाहतूक विस्कळीतपणाचा फटका बसला. चंद्रशेखर बावनकुळे कोकणकन्या एक्स्प्रेसने प्रवास करत होते. कोकणकन्या गाडी जवळपास साडेतीन तास उशिराने धावत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसीय कोकण दौर्‍यावर असून, शुक्रवारी ते रत्नागिरी जिल्ह्यात असणार आहेत.

Exit mobile version