| मुंबई | प्रतिनिधी |
कोकण रेल्वेच्या ‘रोल-ऑन रोल-ऑफ’ (रो-रो) सेवेला नवीन झेप मिळाली आहे. मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने या सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या वॅगनची वहनक्षमता 50 टनांवरून 57 टनांपर्यंत वाढवली आहे.
1999 मध्ये सुरू झालेली ‘रो-रो’ सेवा ही कोकण रेल्वेची एक आगळीवेगळी आणि किफायतशीर वाहतूक योजना आहे. या सेवेअंतर्गत मालवाहू ट्रक थेट रेल्वे वॅगनवर चढवून नेले जातात. त्यामुळे इंधन बचत, चालकांचा थकवा, रस्त्यांवरील गर्दी आणि प्रदूषण यामध्ये मोठी घट होते. नवीन क्षमतेनुसार एका ‘रो-रो’ रेकमध्ये एकूण 50 वॅगन असतील. त्यापैकी 15 बीआरएन वॅगन प्रत्येकी 57 टन वजनाचे ट्रक वाहून नेऊ शकतील, तर उर्वरित 35 बॉक्सएन वॅगन प्रत्येकी 50 टनांपर्यंतचे ट्रक वाहून नेण्यासाठी सक्षम असतील. 57 टन क्षमतेच्या नव्या वॅगनसह पहिली ‘रो-रो’ सेवा बुधवार (दि. 5)पासून सुरू करण्यात आली आहे.
जड वाहन वाहतुकीत वाढरो-रो सेवेच्या क्षमता वाढीमुळे जड व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीस अधिक लवचिकता मिळणार आहे. विशेषतः लोखंड-स्टील, टाइल्स, मार्बल, बांधकाम साहित्य आणि इतर जड मालवाहतूक करणाऱ्या उद्योगांना या सुधारणेचा मोठा फायदा होणार आहे. 50 टनांपेक्षा जास्त वजनाचे ट्रक वाहतूक करू इच्छिणाऱ्या ट्रकचालकांनी कोलाड (9004476090) किंवा सुरथकल (9686656159) येथील आरक्षण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कोकण रेल्वेकडून आवाहन करण्यात आले आहे.







