डिंसेबरमध्ये संघांना पुर्नबांधणीची संधी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
इंडियन प्रीमियर लीग 2026 स्पर्धा पुढच्यावर्षी होणार असली, तरी त्याआधी होणाऱ्या लिलावाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या लिलावातून अनेक संघात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता हा लिलाव कधी होणार आणि त्याआधी खेळाडूंना संघात कायम करण्याची आणि करारमुक्त करण्यासाठी अखेरची तारीख काय असेल, याबाबतची माहिती समोर आली आहे.
आत्तापर्यंत आयपीएलचे 18 हंगाम यशस्वीपणे पार पडले आहेत. आता 2026 मध्ये होणारा 19 वा हंगाम असेल. 18 व्या हंगामापूर्वी मेगा ऑक्शन झाले होते, ज्यात जवळपास सर्वच संघात उलथापालथ झाल्याचे दिसले. काही संघांसाठी हा लिलाव फायद्याचा ठरला, तर काहींसाठी तोट्याचा. महागड्या खेळाडूंचे विक्रमही तुटले होते. आता 19 व्या हंगामासाठी होणारा लिलाव छोटा असेल. परंतु, गेल्या हंगामात खराब कामगिरी झालेल्या संघांना या लिलावातून संघाची पुर्नबांधणी करता येणार आहे. मळािलेल्या माहितीनुसार, आयपीएल 2026 साठी खेळाडूंचा लिलाव डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होऊ शकतो. त्यातही 13 ते 15 डिसेंबरच्या दरम्यान हा लिलाव होण्याची दाट शक्यता आहे. परंतु, अद्याप बीसीसीआयने अधिकृत वेळापत्रक तयार केलेले नाही. तसेच, गेल्या हंगामाप्रमाणे यंदा लिलाव परदेशात न होता भारतातच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जर लिलाव डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होणार आहे, तर फ्रँचायझींना या हंगामासाठी कोणत्या खेळाडूंना संघात ठेवायचे आणि कोणाला करारमुक्त करायचे याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर असणार आहे. त्यामुळे 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व फ्रँचायझींना ही यादी घोषित करावी लागणार आहे. यावेळी ही यादी घोषित करताना अनेक आश्चर्याचे धक्के बसण्याचीही शक्यता आहे.
आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स सर्वात शेवटच्या स्थानांवर होते, अशात हे दोन्ही संघ अनेक खेळाडूंना करारमुक्त करण्याची शक्यता आहे. चेन्नई सुपर किंग्सचा आर अश्विन आधीच निवृत्त झाल्याने त्याला देण्यात आलेली 9.75 कोटींची किंमत चेन्नईच्या पर्समध्ये आहे. याशिवाय ते दीपक हुडा, विजय शंकर, राहुल त्रिपाठी, डेवॉन कॉनवे यांना करारमु्क्त करण्याची शक्यता आहे. याशिवाय राजस्थान रॉयल्सही संजू सॅमसनचे ट्रेडिंग करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजत आहे. याशिवाय ते महिश तिक्षणा आणि वनिंदू हसरंगा यांनाही मुक्त करण्याची शक्यता आहे. कोलकाता नाईट रायडर्स वेंकटेश अय्यरला मुक्त करू शकतात. त्याच्यासाठी त्यांनी तब्बल 23.75 कोटी रुपये मोजले होते.






