गणेशोत्सवासाठी गेलेल्या कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचे नियोजन

| पनवेल | प्रतिनिधी |

कोकणात गणेशोत्सव करून नागरिक वेगवेगळ्या दिवशी परतत असल्याने वाहनांचा ओघ टप्प्याटप्प्याने नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईच्या दिशेने येत आहे. तरीही परतीच्या प्रवासात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग, बिघाड झालेल्या वाहनांसाठी तातडीची मदतीची व्यवस्था आणि 275 हून अधिक अधिकारी- कर्मचारी तैनात, असे नियोजन केले आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या नागरिकांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. गणेशोत्सवासाठी जाताना सर्व नागरिक जवळपास एकाच कालावधीत कोकणाच्या दिशेने रवाना झाल्याने वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले होते. आता मात्र दीड, पाच किंवा दहा दिवसांचा गणेशोत्सव करून नागरिक वेगवेगळ्या दिवशी परतत असल्याने वाहनांचा ओघ टप्प्याटप्प्याने नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईच्या दिशेने येत आहे.

गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन सेवेच्या सुमारे 5800 बस कोकणात सोडण्यात आल्या होत्या. प्रवासादरम्यान बस बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नवी मुंबई पोलिसांनी प्रत्येक किलोमीटरवर बिघाड दुरुस्तीची व्यवस्था, फिरती दुरुस्ती पथके, तसेच क्रेन आणि बिघाडग्रस्त वाहने हटविण्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था केली होती. त्यामुळे आता परतीच्या प्रवासासाठीही अशीच व्यवस्था करण्याचे नियोजन पोलिसांनी आखले आहे.

वाशी ते पनवेल खारपाडा आणि रबाळे आणि वाशी परिसरातील महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच प्रत्येक किलोमीटरवर बिघाड दुरुस्तीची व्यवस्था, फिरती दुरुस्ती पथके, तसेच क्रेन आणि बिघाडग्रस्त वाहने हटविण्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. उरण विमानतळ परिसर, पाम बीच रोड, अटल सेतू यांसह विविध मार्गांवर वाहतूक वळवून वाहनांचा भार विभागण्यात आला होता. परतीच्या प्रवासातही आवश्यकतेनुसार हेच नियोजन कायम ठेवले जाणार आहे, अशी माहिती नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली.

नागरिकांनी जास्तीत जास्त पर्यायी मार्गांचा वापर करावा. त्यामुळे वाहतुकीचा भार विभागला जाईल आणि कोंडी टाळता येईल. वाहन बंद पडल्यास किंवा अन्य कोणतीही मदत आवश्यक असल्यास बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अवजड वाहतूक झाली सुरू
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांचा भार लक्षात घेऊन अवजड वाहनांना 15 सप्टेंबरपर्यंत बंदी घातली होती. आता अवजड वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, कोकणातून परतणारी वाहने टप्प्याटप्प्याने येत असल्याने त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम होणार नसल्याचा वाहतूक विभागाचा अंदाज आहे. असे असले तरी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी 275 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करता यावा यासाठी विविध ठिकाणी दिशादर्शक फलकही लावण्यात आले आहेत. वाहन बंद पडल्यास तातडीने मदत मिळावी यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
ठाणे-कल्याणमध्येही बदल नाही
ठाणे आणि कल्याण-डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणात कोकणवासी राहतात. गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले नागरिक आता परतू लागले असले तरी ते वेगवेगळ्या दिवशी परतत असल्याने वाहतुकीवर एकाच वेळी मोठा ताण येत नाही, असा ठाणे वाहतूक पोलिसांचा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे यंदाही वाहतूक नियोजनात मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी याला दुजोरा देत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे.
Exit mobile version