| ठाणे | प्रतिनिधी |
कोकणचा सुप्रसिद्ध हापूस आंबा वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाला आहे. सणासुदीच्या काळात आंब्याच्या मोहक सुगंधाने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण पसरले असून, ग्राहकांमध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या दिवसात दाखल झालेल्या या आंब्याच्या पेटीला विक्रमी भाव मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.
हापूस आंब्याचा मुख्य हंगाम हा मार्च ते जून दरम्यान असतो. परंतू, हवामानातील बदलामुळे तसेच योग्य पद्धतीने आंब्याच्या मोहोरची निगा राखली तर, काही वेळा तो ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्येही मर्यादित प्रमाणात दिसून येतो. देवगड येथील पडवणे गावातील शिरर्सेकर यांच्या बागेत जुलै महिन्यात तीन ते चार कलमांना आगाऊ मोहोर आला होता. त्यातील दोन कलमांवरील मोहराचे त्यांनी प्लास्टिक आवरण घालून संरक्षण केले होते. योग्य काळजी आणि फवारणीमुळे त्या कलमांवर सुमारे पाच पेट्यांइतकी फळधारणा झाली. त्यापैकी पहिली 6 डझन हापूस आंब्याची पेटी त्यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी (दि.20) वाशी मार्केटकडे रवाना केली आहे. त्यामुळे यावर्षीच्या मोसमी हापूस आंब्यांच्या विक्रीचा प्रारंभ या पेटीद्वारे झाला असून, हापूसच्या पहिल्या पेटीचा मान शिरर्सेकर यांना मिळाला आहे.
वाशी येथील नानाभाऊ जेजुरकर अँड कंपनी या दलालमार्फत ही आंबापेटी विक्रीस ठेवली जाणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आंबा पेटी विक्रीस ठेवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बाजार समितीतील दलालवर्गाकडून सांगण्यात येत आहे.







