कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरांअभावी पडले ओस

| उरण | वार्ताहर |

ग्रामीण विभागातील रुग्णांसाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र हे एकमेव रुग्णालय आहे. मात्र, या रुग्णालयात रात्रभर डॉक्टर थांबत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. तरी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी या रुग्णालयाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामीण भागातील जनता व्यक्त करत आहे.

उरण परिसरातील गरीब, गरजू रुग्णांच्या उपचारासाठी उरण शहरातील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आणि कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र अशी सध्या दोन उपचार केंद्र आहेत. 30 खाटांचे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयावर अवघ्या तालुक्याचा भार आहे. दररोज 250 बाह्यरुग्णांची वर्दळ असलेल्या ग्रामीण रुग्णालयावर इतर अनेक कामांचा वाढता ताण आहे. याउलट, ग्रामीण भागात असलेले कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण विभागातील रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे उरण परिसरातील विशेषता ग्रामीण भागातील गरीब, गरजू रुग्ण उपचारासाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आश्रयाला ये-जा करत आहेत.

मात्र, ग्रामीण भागातील गरीब, गरजू रुग्ण उपचारासाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात ये-जा करत असतात. मात्र, रात्री सात वाजल्यानंतर या कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर थांबत नसल्याने उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सहन करत पनवेल, नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करावे लागले आहे. तरी गोरगरीब रुग्णांना कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय सेवा तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी जातीने लक्ष घालून या रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका यांची रिक्त पदे भरण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक मित्र मंडळी करत आहे.

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या फक्त दोनच महिला डॉक्टर कार्यरत आहेत. मात्र, दोन्ही महिला डॉक्टर रात्री सातनंतर थांबत नाही. यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ लागली आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

डॉ. राजेंद्र ईटकरे,
तालुका वैद्यकीय अधिकारी
Exit mobile version