उपचार न करणार्या डॉक्टरांविरोधात संताप
। उरण । वार्ताहर ।
विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील कंटवळी गावातील दोन चिमुकल्या मुलींना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना बुधवारी (दि.3) घडली आहे. या जखमी मुलींवर प्राथमिक आरोग्य केंद्र, कोप्रोली व इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, उरण या दोन्ही शासकीय रुग्णालयात उपचार न केल्याने त्यांना नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटवळी गावातील मैथिली विनोद ठाकूर (वय 3) व ईशा संतोष ठाकूर (वय 3) या दोन चिमुकल्या मुलींना घराजवळील प्रांगणात खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी कान, हात आणि पायावर चावा घेतला. गावातील रहिवाशांनी प्रसंगी सावधपणाने दोन्ही मुलींना कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले. जखमी झालेल्या मैथिली व ईशा या दोघींना उपचारासाठी आईवडिलांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली येथे दाखल केले.परंतु, या रुग्णालयातील डॉक्टरांनी जखमी मुलींवर उपचार न करता तुम्ही उरण शहरातील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात जा, असा सल्ला दिला. दोन्ही मुलींच्या नातेवाईक मंडळींनी उरण शहरातील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात जखमी अवस्थेत मूलींना दाखल केले असता रुग्णालयातील डॉक्टरांनी या रुग्णालयात मुलींवर उपचार होणार नाहीत, तुम्ही इतर रुग्णालयात घेऊन जा, असा सल्ला दिला.
मैथिली व ईशा यांच्या नातेवाईकांनी विनंती केल्यानंतर ही जखमी अवस्थेत तडफडणार्या दोन चिमुकल्या मुलींवर उपचार न केल्याने दोन्ही मुलींच्या आईवडिलांनी वैद्यकीय अधिकारी, डॉक्टरविरोधात संतप्त भावना व्यक्त केली. तसेच तातडीने नवी मुंबई येथील रुग्णालयात दोन्ही मुलींना दाखल करुन घेतले. सध्या दोन्ही मुलींवर नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मैथिली व ईशाच्या नातेवाईक मंडळींनी दिली आहे.
उरण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली व इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात कुत्रा चावल्यानंतर व सापाचा दंश झाल्या नंतर उपचार होत नसतील तर ही खेदाची बाब आहे.कारण या अगोदर ही अशा प्रकारच्या घटना घडल्या नंतर वेळीच उपचार न होऊ शकल्यामुळे रानसई या आदिवासी वाडीवरील मूलगा व महिला कुत्रा चावल्यानंतर दगावले आहेत.तसेच साप चावून इतर रुग्ण दगावले आहेत.आणि असे असतानाही प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली व इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण येथील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर हे रुग्णांवर उपचार करुन घेत नसतील तर ते योग्य नाही. यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बी.एन.ठाकूर यांनी केली आहे.
मैथिली व ईशा ठाकूर या दोन मुलींना कुत्रा चावल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली येथे दाखल केल्यानंतर उपचार होणे गरजेचे आहे. जर दोन्ही मुलींवर उपचार झाला नसेल.तर त्याप्रकरणी मला काहीही माहीती नाही. तरी, मी माहिती घेऊन आपणास कळवित असल्याचे उरण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र इटकर यांनी सांगितले.
या मुलींवर प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली येथे उपचार करुन घेणे गरजेचे आहे. कारण, ते त्यांचे काम आहे. परंतु, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर हे सर्पदंश, कुत्रा चावल्यानंतर किंवा इतर रुग्णांना उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन घेण्यासाठी पाठवित आहेत. हे योग्य नाही. मुली लहान असल्या कारणाने इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन घेतले नाही. त्यांच्यावर तात्पुरत्या स्वरूपात उपचार करुन पुढील रुग्णालयात जाण्याचा सल्ला रुग्णालयाकडून देण्यात आला आहे.