अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळूनही वनविभागाचे अधिकारी या कामाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे पनवेल तालुक्यातील आपटा-कोरलवाडी येथील आदिवासी बांधवांनी अलिबाग येथील वन विभागाच्या कार्यालयासमोर मंगळवारी बेमुदत उपोषण सुरु केले होते. सायंकाळी उशिरा उप वन संरक्षक अशिष ठाकरे यांनी या उपोषणाची दखल घेत लेखी आश्वासन दिल्याने आदिवासी बांधवांनी आपले बेमुदत उपोषण स्थगित केले आहे.
पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीतील कोरलवाडी आदिवासी वाडीच्या रस्त्याची प्रशासकीय मंजुरी मिळून मागील दीड वर्षापासून निधी पडून आहे परंतु वनविभाग अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे मंगळवारी (दि. 11 जानेवारी) कोरलवाडी येथील ग्रामस्थांनी ग्राम संवर्धनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग विभागाचे उप वनसंरक्षक अशिष ठाकरे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होतेे. याबाबत उप वन संरक्षक अशिष ठाकरे यांनी दखल घेत आदिवासी बांधवांना लेखी आश्वासन दिले. कोरलवाडी आदिवासी रस्त्याचा कलम 3(2) खालील प्रस्ताव आजपासून एक आठवड्यात संबंधित प्रकल्प यंत्रणा म्हणजेच उप अभियंता (बांधकाम) रायगड जिल्हा परिषद उपविभाग पनवेल, वन परिक्षेत्र अधिकारी पनवेल व पेण तसेच आपटा व कर्नाळा ग्रामपंचायत यांचेशी संबंधित त्रुटींची पुर्तता करतील असे गृहीत धरुन त्यानंतर एका आठवड्यात प्रस्तावास मंजुरी देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल असे या लेखी आश्वासनात म्हटले आहे.







