अर्ज घेण्यासाठी उमेदवारांची तहसील कार्यालयात गर्दी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यामध्ये कोतवाल भरती प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. यासाठी लागणारे अर्ज घेण्यासाठी उमेदवारांची तहसील कार्यालयात गर्दी होऊ लागली आहे. पाच दिवसात 25 हून अधिक उमेदवारी अर्ज घेण्यात आले आहेत. 17 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज कागदपत्रांसह दाखल करण्याची प्रक्रीया सुरु राहणार असल्याची माहिती निवड समितीचे सदस्य सचिव अर्थात तहसीलदार विक्रम पाटील यांच्याकडून उपलब्ध झाली आहे.
महसूल सेवक अर्थात कोतवालाच्या 19 जागांसाठी ही भरती होणार आहे. अनुसूचित जातीसाठी तीन, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ड या वर्गासाठी प्रत्येकी एक अशा तीन, भटक्या जमाती क,एसईबीसी, ईडब्लूएस वर्गासाठी प्रत्येकी दोन अशा सहा, आणि अराखीव (खुला) वर्गासाठी चार जागांचा समावेश आहे. यामध्ये सर्वसाधारणसाठी 13 आणि समांतर आरक्षण महिलांसाठी सहा जागांचा समावेश असणार आहे. उमेदवार चौथी उतीर्ण असावा. त्याला मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. किमान 18 ते 40 वर्षे वय असावे, ही शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा आहे. या भरतीसाठी उमेदवारी अर्ज देण्याची सुरुवात दोन ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. अलिबागमधील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दिले जात आहेत. हे अर्ज भरल्यावर कागदपत्रांसह 17 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. कोतवाल अर्थात महसूल सेवक या पदासाठी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी उमेदवारांनी तहसील कार्यालयात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. कोतवाल भरतीसाठी 12वी पासून पदवीधर उमेदवारांकडूनदेखील अर्ज भरण्यात आले आहेत. आतापर्यंत 25 हून अधिक अर्ज भरले असल्याची माहिती तहीसल कार्यालयाकडून देण्यात आली आहे.






