| पनवेल | वार्ताहर |
खारघरमध्ये पुन्हा एकदा कोयता गँग सक्रिय झाली आहे. तीन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास एकाच रात्री खारघर उपनगरामधील सेक्टर 16 येथील वास्तुविहार सोसायटीमधील ज्या घरांना कुलूप होते अशा घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. गृहसंकुलातील संस्कृती सोसायटीमधील एका घरातील लाकडी कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 17 लाख 80 हजारांचा मुद्देमाल चोरला. त्यानंतर चोरट्यांनी पहिल्या मजल्यावरील बंद घराचे कुलूप तोडून 45 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. तब्बल 18 लाख रुपयांची घरफोडी करून ते चोरटे फरार झाले. हातामध्ये कोयता घेतलेली ही चोरट्यांची टोळी घरात लूटमार करत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







