| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरात नगरपरिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली होती. त्यावेळी वखार नाका येथे असलेली क्रांतीज्योत निवडणूक प्रशासनाने झाकून ठेवली होती. कारण ही क्रांतीज्योत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे निवडणूक असलेले मशाल चिन्ह आहे. परंतु, ही क्रांतिज्योत झाकून ठेवताना चक्क सिमेंट पिशवीचा वापर केल्याने शिक्षणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर माथेरान नगरपरिषद निवडणूक यंत्रणेला आपली चूक लक्षात येताच क्रांतिज्योत सिमेंट पिशवी मुक्त केली.
माथेरान शहरात महात्मा गांधी रस्त्यावर वखार नाका येथे प्राचार्य गव्हाणकर चौक आहे. त्या चौकात माथेरानमध्ये शाळा उभारून शिक्षणाची दारे उघडणाऱ्या गव्हाणकर यांचा गौरव करण्याचा प्रयत्न झाला आहे. शिक्षणाच्या बाबतीत क्रांतीज्योत महत्वाची समजली जाते, त्यामुळे त्या चौकात दर्शनी भागात क्रांतीज्योत उभारली असून हीच क्रांतीज्योती नगरपरिषद निवडणुकीत निवडणूक यंत्रणेसाठी अडथळा ठरली होती. निवडणुकीमध्ये मशाल हे निवडणूक चिन्ह शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणेने ती मशाल सदृश क्रांतीज्योत निवडणूक काळात झाकून ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, वखार नाक्यावरील क्रांतीज्योती झाकून ठेवली जात असताना त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. ही क्रांतीज्योती सिमेंट भरण्यासाठी वापरली जाणाऱ्या पिशवीने झाकण्यात आली होती. यावेळी मशाल आणि क्रांतीज्योत यात काही फरक वाटत नाही का? असा प्रश्न शिक्षणप्रेमींनी उपस्थित केला होता. शेवटी निवडणूक यंत्रणेला आपली चूक उमगली आणि त्यांनी वखार नाक्यावरील क्रांतीज्योत सिमेंट पिशवी मुक्त केली.







