अहमदनगर जिल्ह्याने पटकावले सलग दुसर्यांदा विजेतेपद
। पुणे । वृत्तसंस्था ।
शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज 2024 स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याने सलग दुसर्या वर्षी विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात आदित्य शिंदे विजयचा शिल्पकार ठरला. अहमदनगर संघाने सांघिक खेळ करत संपूर्ण स्पर्धेत आपले वर्चस्व राखले. अहमदनगर संघाने या स्पर्धेत 17 सामने खेळले. अहमदनगर संघाने 16 विजय व 1 सामना बरोबरीत ठेवत संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला.
सामन्याच्या पहिल्याच चढाईत पालघरच्या प्रतिक जाधची सौरव मेद ने पकड करत अहमदनगर संघाचा खात उघडला. तर शिवम पठारेची जीत पाटील ने पकड करत पालघर संघाचा खात उघडला. 5 मिनिटा नंतर अहमदनगर संघाकडे 3-1 अशी आघाडी होती. अहमदनगर कडून आदित्य शिंदेने चढाईत आक्रमक चढाया करत गुण मिळवले. 11 व्या मिनिटाला पालघर संघाला ऑल आऊट करत अहमदनगर संघाने 12-04 अशी आघाडी मिळवली. अहमदनगर कडून चढाईत आदित्य शिंदे ने तर पकडीत सौरव मेद ने उत्कृष्ट पकडी करत अहमदनगर संघाला आघाडी मिळवून दिली.
अहमदनगर संघाकडे मध्यंतराला 16-09 अशी आघाडी होती. अहमदनगर संघ पूर्णपणे रणनीतीने खेळत होता. अहमदनगरच्या चढाईपटूंना समोर पालघरची बचावफळी अपयशी ठरली. मध्यांतर नंतरही दोन्ही संघानी कोणत्याही प्रकारे आक्रमकता न दाखवता शांत सुरुवात केली. अहमदनगर संघ सहजपणे गुण मिळवत आपली आघाडी वाढवत होता. 13 मिनिट शिल्लक असताना अहमदनगर संघाने पालघर संघाला ऑल आऊट करत 25-11 अशी निर्यायक आघाडी मिळवली होती. पालघरची बचवाफळी आज पूर्णपणे अपयशी ठरली. तर पालघरच्या प्रतिक जाधव सुद्धा आज चढाईत अपयशी ठरला.
अहमदनगर संघाने संपूर्ण सामन्यात सांघिक खेळाचे प्रदर्शन करत सामन्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करत विजेतेपद पटकावले. अदित्य शिंदेने सुपर टेन करत पूर्ण करत अहमदनगर संघाचा विजय सोपा केला. अहमदनगर संघाने 41-17 असा अंतिम सामना जिंकला. अहमदनगर संघाकडून आदित्य शिंदे ने चढाईत 12 गुण मिळवले. तर शिवम पठारे ने 5 व प्रफुल झवारे ने 4 गुण मिळवले. तर सौरव मेद व संकेत खलाटे ने उत्कृष्ट पकडी करत प्रत्येकी 3 गुण मिळवले. पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अर्जुन पुरस्कार विजेते, प्रो कबड्डी सिजन 10 विजयी पुणेरी पलटण संघांचे प्रशिक्षक बी. सी. रमेश, क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली ताई चाकणकर, विपश्यना केंद्राचे अध्यक्ष दत्ता कोहिणकार, भोई फौंडेशनचे फाऊंडर मिलिंद भोई, युवा कबड्डी सिरीजच्या सिईओ विकास गौतम, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष शशिकांत गाडे, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सिईओ सचिन भोसले तसेच उद्योग क्षेत्रातील व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.