कृषीवलची खास झटपट रेसिपी! वाळवणः अडीनडीची साठवण

लेखक : नेहा कवळे

पावसाळ्यात भाज्या आणि मासे तुरळक असण्याच्या काळात कामाला येते ते वाळवण. आज वाळवणांचा पूर्वीचा रुबाब क्वचितच दिसत असला तरीही वाळवण म्हणजे अवघी आनंदाची साठवणच असते. चारचौघींनी चक्क पोरांना सोबतीला घेऊन सुट्ट्यांच्या तापल्या दिवसांत केलेले पदार्थ म्हणजे वाळवणं. आजही आपल्यापैकी कित्येकांच्या घरी उन्हाळ्यात वाळवणाचा कार्यक्रमाचा बेत आखला जातो. गावाकडून मुंबईला स्थायिक झालेल्या बायकादेखील वर्षभराच्या बेगमीसाठी दरवर्षी आठवडाभराची रजाही घेतात. आजकाल मुंबईत जरी राहायला जागा नसली तरीदेखील लहानशा गच्चीतही हे वाळवणाचे बेत आखले जातात.

उन्हाचे चटके बसू नयेत किंवा वाळवणाला चांगले ऊन मिळावे म्हणून हे सगळे पदार्थ सकाळी लवकर उठून केले जातात. कारण ऊन वाढले की पायाला चटके बसतात. मग ते वाळवणं घालायला त्रास होतो. शिवाय उशिरा वाळवण घातले की मग त्यांना ऊनही कमी लागते. मग अंगण, गच्ची आदी कुठेही जिथे वाळवणं घालायची तिथली जागा स्वच्छ केली जाते.

त्यावर एखादे प्लास्टिकचे भले मोठे कापड टाकले जाते आणि ते उडू नये म्हणून त्याच्या कोपर्‍यावर विटा किंवा दगड ठेवले जातात आणि मग नाचणीचे, नंतर उडदाचे पापड, मग साबुदाण्याच्या पापड्या आणि चकल्या, नंतर मिश्र डाळींचे वडे किंवा सांडगे, आणि मग सगळ्यात शेवटी गव्हाच्या कुरडया. कारण गव्हाच्या चिकाच्या कुरडया करायच्या म्हणजे मोठाच घाट घालवा लागतो. ते गहू भिजत घालून आंबवणं वगैरे..अशी ही घरोघरी दिसणारी वाळवणं महिलेच्या किंवा मुलांच्या कौतुकाचा, आनंदाचा आणि औत्सुक्याचा विषय असायचा. मात्र आता ती मोठी अंगणं नाहीत किंवा गच्च्या नाहीत. त्यामुळे वर्षभराची ही बेगमी आता कित्येकांच्या आठवणीतच राहिलेली दिसून येत आहे.

गुजरातमध्ये मुगाचे आणि उडदाचे पापड बनवले जातात. खारोडे, सांडगी मिरची, कोहळ्याचे सांडगे, केळ्याचे वेफर्स, सालपापड्या, मिश्रडाळींचे वडे अशी ही वैविध्यपूर्ण रेलचेल असली तरीही यात आता नव्याने दाखल झालेले काही पदार्थ आहेत. साबुदाण्याच्या चिकोड्यांचा कंटाळा आला असेल तर कच्ची केळी शिजवून ती गार झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायची. त्यात मावेल इतका साबुदाणा भिजवून ठेवायचा. जिरं, मीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट घालून सटासट चकल्या पाडायच्या. या चकल्यांमध्ये बटाट्यांचे काही काम नाही. नुसत्या वरण-भातासोबत उन्हाने खरपूस तापून निघालेल्या केळीसाबुदाण्याच्या दणदणीत फुलणार्‍या या चिकोड्या वर्षभर टिकतात. झटपट होणार्‍या कॅार्नफ्लोअरच्या कुरड्याही अशाच रुचकर. जितकं पीठ तितकं पाणी घालून हिंग आणि मीठ घालून हे मिश्रण गॅसवर ठेवायचं. मिश्रणातील डाव हलता हलेनाशी झाली की, कुरड्यांच्या घालायची वेळ आली असं समाजायचं. शेवेचा सोरा लावून हे मिश्रण गरम असतानाच कुरडया पाडायच्या.टोमॅटो, फणसाच्या वेफर्सचे कामही झटपट. कच्चे पण जून गरे घेऊन त्यात लांबट काप करून घ्यायचे. कुकरमध्ये चाळणीवर वाफवून उन्हात चार दिवस कडकडीत वाळवायचे. ज्यावेळी वेफर्स हवे असतील, तेव्हा तिखट, मीठ, लिंबासोबत हे तोंडी लावणं तय्यार…

गव्हाच्या कुरडया केल्यानंतर उरलेल्या चोथ्यामध्ये वाढीव गव्हाचं पीठ घालून त्याचे फर्मास पापडही करता येतात. वाळवणांवर सध्या रेडीमेडची सावली आली आहे. त्यातला खटाटोप शंभर टक्के मान्य असला तरीही चारचौघींनी एकत्र येऊन केल्या जाणार्‍या या वाळवणांच्या दिवसांनी चवीच्या रंगढंगानुसार गृहिणींची सुखदुःख वाटून घेतली आहेत. लग्नातल्या रुखवतामध्ये रंग भरलेले वाळवणं विकत मिळतील पण त्यातल्या या गोडधोड आठवणींचं काय?

मठ आणि मुगाचे सांडगे

मठ आणि मुगाचे सांडगे
साहित्य : मठाची डाळ आणि मुगाची डाळ प्रत्येकी पाव किलो, तिखट, मीठ, हिंग, हळद, जिर्‍याची पूड, धण्याची पूड
कृती – रात्री मठाची डाळ आणि मुगाची डाळ भिजत घालावी. चांगली भिजल्यावर सकाळी जाडसर वाटावी. त्यात तिखट, मीठ, हिंग, हळद, जिर्‍याची पूड, धण्याची पूड घालून लहान बोराएवढे गोळे प्लॅस्टिकवर घालून खडखडीत होईपर्यंत वाळू द्यावेत.

बाजरीचे सांडगे

बाजरीचे सांडगे
साहित्य : अर्धा किलो बाजरी, 1 वाटी ताक, मीठ, दोन चमचे लसूण पेस्ट, लाल तिखट आणि कोथिंबीर.
कृती – बाजरी निवडून तीन-चार तास पाण्यात भिजत घालून नंतर उपसून मिक्सरवर दळावी. मिक्सरवर केल्यास जरासे भरडेच वाटा. रात्री ताकात बाजरीचा भरडा भिजवून रात्रभर पीठ आंबू द्या. दुसर्‍या दिवशी चार वाट्या पिठाला आठ वाट्या पाणी घेवून गॅसवर मोठ्या भांड्यात पाणी उकळू द्यायचे. त्यात लसूण पेस्ट, लाल तिखट व मीठ घालावे. पाणी चांगले उकळल्यावर त्यात बाजरीचे आंबवलेले पीठ घालून चांगले शिजू द्यावे. मंद आचेवर झाकण ठेवून शिजवावे आणि घेरावे. पिठाला दाटपणा आल्यावर चांगले हलवून गॅसवरून खाली उतरवून जरा थंड झाल्यावर प्लास्टिक पेपरवर अथवा ताटावर छोट्या वड्या टाकाव्या. कडक उन्हात दोन-तीन दिवस वाळवावे.

ज्वारीचे पापड

ज्वारीचे पापड
साहित्य – एक किलो ज्वारी, 3-4 लसणीचे गड्डे, दोन चमचे जिरे, दोन चमचे तीळ, मीठ, तिखट तीन चमचे.
कृती – ज्वारी तीन दिवस भिजवावी. तिसर्‍या दिवशी धुवून थोडावेळ सावलीत वाळवून व मिक्सरवर दळावी व एका सूती कापडात घट्ट बांधून ठेवावी. चौथ्या दिवशी ज्वारीच्या दुप्पट पाणी गरम करून त्यात मीठ व वाटलेली लसूण, जिरे, तीळ, तिखट घालावे. नंतर वाटलेले ज्वारीचे पीठ हळूहळू सोडावे, ते हलवत राहावे. शिजवताना पीठात बुडबुडे आले की पीठ शिजले असे समजावे. मग ओला रुमाल करून त्यावर थोडे पीठ घालून हाताला पाणी लावून पातळ थापावे व कडकडीत उन्हात वाळवावे. बिबड्या चांगल्या कडकडीत वळण्यासाठी 2-3 दिवस तरी लागतात.

साबुदाणाच्या चकल्या

साबुदाणाच्या चकल्या
साहित्य – बटाटे एक किलो, साबुदाणा अर्धा किलो, भगर पाव किलो, लाल तिखट. आलं, जिरे, मीठ चवीनुसार.
कृती – बटाटे उकडून साले काढून घ्यावीत. साबुदाणा रात्रभर भिजवून घ्यावा. भगर सुद्धा मऊ शिजवून घ्यावी. नंतर सर्व साहित्य एकत्र करून मळावे. चवीपुरते मीठ घालून चकलीच्या सोर्‍यामधून चकल्या पाडून त्या कडकडीत उन्हात वाळवाव्यात.

ताकातली मिरची

ताकातली मिरची
हिवाळ्यात मिळणार्या थोड्या जाडसर मिरच्या अर्धा किलो घेऊन त्यांना मध्ये चीर द्यावी. नंतर ताकात चवीपुरते मीठ, हिंग, जिरे पावडर घालून चांगले एकत्र करून घ्यावे. आणि या चीर दिलेल्या मिरच्या ताकात 2 दिवस बुडवून मग एका प्लॅस्टिक कागदावर ठेवून 2-3 दिवस सावलीत वाळवाव्यात.

गोड आवळा सुपारी

गोड आवळा सुपारी
साहित्य – अर्धा किलोआवळे, एक किलोसाखर.
कृती – आवळे एका भांड्यात चाळणीवर ठेवून शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर पाकळ्या मोकळ्या करून साखरेत बुडवून 2-3 दिवस ठेवावे. दिवसातून तीन/चार वेळा वरील मिश्रण हलवावे. चौथ्या दिवशी चाळणीवर फोडी घालून निथळून घेऊन उरलेली साखर काढून घ्यावी. आणि 3-4 दिवस सावलीत वाळवावे.

साबुदाण्याचे पापड

साबुदाण्याचे पापड
साहित्य – एक किलो साबुदाणा, मीठ, पाणी.
कृती – साबूदाणा धुऊन रात्रभर भिजत घालावा. दुसर्‍या दिवशी सकाळी साबुदाणा बुडेल इतक्या आधणात चवीपुरते मीठ घालावे व त्यात भिजवून ठेवलेला साबूदाणा घालून चांगला शिजवावा आणि प्लॅस्टिकच्या कागदावर पळीने किंवा चमच्याने, हव्या असतील, तशा लहान किंवा मोठ्या पापड्या घालाव्यात.

बटाटे वेफर्स

बटाटे वेफर्स
साहित्य – एक किलो बटाटे, चवीप्रमाणे मीठ, तुरटी, 8-10 वाट्या पाणी.
कृती – बटाटे स्वच्छ धुऊन त्याची साले काढून घेवून धुवावे. वेफर्सच्या किसणीवर त्याच्या काचर्‍या करून पाण्यात टाकाव्यात. एकीकडे पाणी उकळून घ्यावे, त्यातच चवीनुसार मीठ आणि थोडी तुरटी पूड टाकावी. या उकळत्या पाण्यात काचर्‍या घाला. मध्येमध्ये त्याला हलवत राहावे. बटाट्याच्या काचर्‍या वर येऊ लागल्या की त्यांना चाळणीत काढून घ्यावे आणि पाणी निथळून काचर्‍यांना प्लॅस्टिकच्या कागदावर घालून कडकडीत उन्हात वाळवून घ्याव्यात.

उडीद पापड

उडीद पापड
साहित्य – 1 किलो उडदाच्या डाळीचे पीठ, 100 ग्रॅम पापडखार, 2 टे.स्पून बारीक मीठ, 10 ग्रॅम पांढरे मिरे, 20 ग्रॅम काळे मिरे, , 1 वाटी तेल, थोडा हिंग.
कृती – उडदाची डाळ दळून आणावी, 2 वाटया पीठ बाजूला काढून ठेवावे, 5 वाटया पाणी पातेल्यात घ्यावे त्यात पापडखार व मीठ घालून उकळावे. पाणी गार झाल्यावर गाळून घ्यावे. मिर्‍यांची व हिंगाची पूड करावी. उडदाच्या डाळीच्या पिठात मिरपूड, हिंग घालून पापडखार व मिठाच्या उकळून गार केलेल्या पाण्याने पीठ घट्ट भिजवावे. पीठ शक्यतो 2-3 तास आधी भिजवून ठेवावे. पाट्याला व वरवंट्याला तेलाचा हात लावून पापडाचे पीठ कुटावे. पीठ कुटून त्याचा मऊ गोळा झाला पाहिजे. पीठ कुटताना अधून मधून पिठाचा गोळा हाताने ताणून लांब करून परत गोळा करून कुटावा. पिठाचा गोळा मऊ झाला की, तेलाच्या हाताने सारख्या आकाराच्या लाट्या करून झाकून ठेवाव्यात व एक एक लाटी उडदाच्या डाळीच्या पिठीवर पातळ लाटावी व पापड तयार करावे. तयार झालेले पापड कडकडीत उन्हात वळवावेत.

नाचणीचे पापड

नाचणीचे पापड
साहित्य – नाचणी 1 किलो, 5-6 वाट्या पाणी, पापड खार, मीठ चवीनुसार, अर्धी वाटी तेल.
कृती – नाचणी एक दिवस पाण्यात भिजवून ठेवावी. दुसर्‍या दिवशी उपसून सावलीत वाळवत घालावी. आता ही नाचणी दळून पापड करण्यासाठी वापरावी. एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवून त्यात पापडखार, थोडे मीठ हे मिसळून घ्यावे. या गरम गरम मिश्रणात मावेल तेवढेच नाचणीचे पीठ घालून ढवळून त्याला चांगले शिजवून घ्यावे. हे मिश्रण 5 मिनिटे झाकून ठेवावे. नंतर मिश्रण ताटात काढून तेलाचा हात लावून चांगले मळून घ्यावे. या गोळ्याचे लहान लहान गोळे करून पोळपाटावर खाली प्लास्टिक पेपर पसरून त्यावर गोळा ठेवून त्यावरही प्लास्टिक पेपर ठेवा व पातळ लाटावे आणि उन्हात वाळवावे.

कुरडया

कुरडया
साहित्य – 1 किलो गहू, मीठ, 1 चमचा हिंग पावडर, थोडी तुरटी.
कृती – गहू 3 दिवस पाण्यात भिजत घालावे. लक्षात ठेवून प्रत्येक दिवशी गव्हातले पाणी बदलावे. तिसर्‍या दिवशी गहू वाटून त्यातील सत्व काढून घ्यावे. हे वाटलेले सत्व रात्रभर झाकून ठेवावे. दुसर्‍या दिवशी वर आलेले निवळीसारखे पाणी फेकून द्यावे व खालील दाट सत्व भांड्याने मोजून घ्यावे. जेवढी भांडी गव्हाचे सत्व असेल तेवढी भांडी पाणी उकळायला ठेवावे. पाण्यात अंदाजे मीठ व हिंगाची पावडर आणि थोडी तुरटी घालावी व पाण्याला उकळी आल्यावर भांड्यात एका बाजूने गव्हाच्या सत्वाची धार धरून पीठ लाकडी चमच्याने सतत हलवावे. गुठळी होऊ देऊ नये. पीठ शिजत आले की, घट्ट चकचकीत व पारदर्शक होईल. पीठ खाली उतरवून शेवेच्या सोर्यात भरून प्लॅस्टीकच्या कागदावर छोट्या मोठ्या कुरडया घालाव्यात व कडकडीत उन्हात वळवाव्यात.

शेवया

शेवया
साहित्य – 1 कि. गव्हाचा रवा, अर्धा कि. मैदा, चवीला मीठ आणि थोडं तेल.
कृती – रवा व मैदा एकत्र करून चवीनुसार मीठ घालून भिजवावा. शेवया करायच्या चार तास आधी पीठ भिजवून आणि झाकून ठेवावं. नंतर हाताला तेल लावून सैलसर मळून घ्यावं. या पिठाचा लहान गोळा हातात घेऊन तो लांबवावा. दोन्ही हातानी लांबवून बोटांवर घेऊन पदर काढावे. लांबवताना हे पदर बारीक होतात. हे पदर जितके लांब तितकी शेवयी तेवढी बारीक होते. हे पदर तोडून कापड घातलेल्या खाटेवर टाकावे आणि उन्हात वाळवावे.

Exit mobile version