कृष्णा महाडिक यांच्या कामाचे पंडित पाटील यांच्याकडून कौतुक

। तळा । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्षाचे मा.आमदार पंडित पाटील यांनी रायगड भूषण कृष्णा महाडिक यांच्या कामाचे कौतुक केले आहे. मुंबई गोवा महामार्गावर कशेणे येथे पंडित पाटील यांनी कृष्णा महाडिक यांचा सत्कार केला.यावेळी बोलताना पंडित पाटील यांनी सांगितले की कृष्णा महाडिक यांनी कोरोना काळात जिल्ह्यात उत्तम प्रकारे काम केले आहे.कोरोना काळात रक्ताचा तुटवडा जाणवत असताना महाडिक यांनी रक्तदान शिबिरे आयोजित करून मोठ्या प्रमाणावर रक्त संकलित केले होते. त्यांच्या या कार्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून देखील कौतुक करण्यात आले. 3 जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात रायगड जिल्ह्यातील बहुतांश शाळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी शाळांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. ही गोष्ट महाडिक यांना समजताच त्यांनी स्वतः कामाकडे जातीने लक्ष देऊन सीएसआर फंड तसेच इतर माध्यमातून निधी उपलब्ध करून जिल्ह्यातील विविध शाळांचे नूतनीकरण केले आहे. जिल्हा परिषदेकडून त्यांना रायगड भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्यासारखे कार्यकर्ते जिल्ह्याला लाभल्यास जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हायला वेळ लागणार नाही असेही यांनी सांगितले.

Exit mobile version