पिगी बँक इन्व्हेस्टींग पुस्तक प्रकाशित
। मुंबई । प्रतिनिधी ।
सामान्यपणे लहान मुलांना अल्पबचतीतून पैसे जमवण्याची शिकवण दिली जाते. मात्र सध्याच्या नव अर्थसाक्षरांचा आपल्या साठवलेल्या पैशाला कामाला लावून त्यातून अधिक पैसा कमवण्याकडे कल असतो. मग आपण साठवलेल्या पैशाला कुठे आणि कसे गुंतवल्यास तो अधिक परतावा देईल, असा विचार करणे आवश्यक होते. ही गुंवणूक अगदी लहान वयात सुरू करता यावी, या हेतूने अगदी शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना हे गुंतवणुकीचं शास्त्र सहज, साध्या आणि सोप्या शब्दांत सांगण्याचे काम कृष्णवीर कायगावकर या इयत्ता अकरावीमध्ये शिकणार्या कुमारवयीन लेखकाने आपल्या पिगी बँक इन्व्हेस्टींग (Piggy Bank Investing) या पुस्तकामध्ये केले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम 4 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या टायटल व्हेव्ज बूक स्टोअरमध्ये एव्हेण्डस् कॅपिटल या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एण्ड्रयू ह़ॉलण्ड यांच्या हस्ते संपन्न झाला.
कृष्णवीरने या छोटेखानी पुस्तकाची रचना त्याच्या समवयीनांना सहज कळेल अशाप्रकारे केली आहे. पुस्तकाच्या सुरूवातीला तो लहान वयामध्येच केलेली गुंतवणूक कशी फायदेशीर ठरते ते सप्रमाण दाखवून देतो. आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ लहान वयातच गुंतवणूक (investment) सुरू करणार्या वॉरन बफे, राकेश झुनझुनवाल्यांसारख्या व्यक्तिमत्त्वांचा तो आधार घेतो. पुढच्या प्रकरणांमध्ये त्याने सोप्या भाषेत अर्थव्यवस्था आणि शेयर मार्केट, त्यात सामान्यतः वापरल्या जाणार्या संज्ञा आणि संकल्पना, आर्थिक गुंतवणुकीचे निरनिराळे आयाम आणि गुंतवणूकदाराच्या वैयक्तिक आकलन तथा अनुसंधानाचे महत्त्व अशा विषयांचा उहापोह केलेला दिसतो.
शेवटच्या प्रकरणामध्ये कृष्णवीर त्याच्याच वयाच्या मुलांना स्वतःचा समतोल पोर्टफोलिओ बनवण्याबद्दल मार्गदर्शन करतो. त्यासाठी योग्य समभागांची निवड, नव्या युगातील क्रिप्टो चनलाच्या गुंतवणुकीतील योग्यायोग्यता, विविध कंपन्यांच्या कार्यपद्धतींचा गुंतवणूकदारांवर होणारा परिणाम आदी विषयांचा परामर्ष घेऊन तो आपली भूमिका केस स्टडीच्या आधारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो.
प्रसिद्ध सराफ आणि चिंतामणी ज्वेलर्सच्या अरुण कायगावकरांचा नातू असलेल्या कृष्णवीरची आर्थिक समज वाखाणण्यासारखी आहे. आपले गुंतवणुकीसारख्या कठीण विषयातले विचार त्याने आपल्या पिगी बँक इन्व्हेस्टींग या पहिल्याच पुस्तकात फार प्रगल्भपणे मांडलेले दिसतात. म्हणूनच हे पुस्तक कृष्णवीरसारख्याच कुमारवयीन गुंतवणूकदारांना स्वतःची गुंतणूक करण्याला निश्चितच प्रोत्साहन देईल, अशी खात्री वाटते.