| मुंंबई | प्रतिनिधी |
मुंबईत पार पडलेल्या मिस वर्ल्ड 2024 स्पर्धेत झेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टिना पिस्कोव्हा हिनं विश्वसुंदरीचा ‘ताज’ पटकावला. तर, लेबनॉनची यास्मिना हिनं रनरअप विजेतापदावर नाव कोरलं. भारताची सिनी शेट्टी हिला मात्र पहिल्या चार स्पर्धकांमध्ये स्थान पटकावता आलं नाही. शनिवारी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा ग्रँड फिनाले पार पडला.
मिस वर्ल्ड 2024 ची स्पर्धा मुंबईत शनिवारी (दि.9) रात्री आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंचावर 12 ज्युरींनी स्पर्धेत सहभागी झालेल्यांचं परीक्षण केलं. यात बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनॉन, पूजा हेगडे, मिस वर्ल्ड संघटनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्युलिया एव्हलन मॉर्ले, समाजसेविका अमृता फडणवीस, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, चित्रपट निर्माता साजिद नाडियादवाला, पत्रकार रजत शर्मा, विनीत जैन, मिस वर्ल्ड इंडियाचे चेयरमन जामिल सैदी आदींसह माजी तीन मिस वर्ल्ड यांचा समावेश होता. यावेळी परीक्षकांनी झेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टिना पिस्कोव्हा हिला विश्वसुंदरी घोषित केलं.
तब्बल 28 वर्षानंतर ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती. या अगोदर 1997 ला ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारी सिनी शेट्टी अंतिम आठपर्यंत पोहोचली होती, मात्र तिला अंतिम चारमध्ये स्थान मिळवता आले नाही. अंतिम चारमध्ये मिस त्रिनिदाद आणि टोबॅगो, मिस बोत्सवाना, मिस चेक रिपब्लिक आणि मिस लेबनान यांची निवड झाली. या मिस चेक रिपब्लिक क्रिस्टिना पिस्कोवा हिने बाजी मारली आणि माजी मिस वर्ल्डने विजेतेपदाचा ताज दिल्यानंतर तिच्या आनंदाला पारावार उरला नाही.
कोण आहे क्रिस्टिना पिस्कोवा? क्रिस्टिना पिस्कोवा ही कायद्याची विद्यार्थीनी आहे. यासोबत ती मॉडेलिंगही करते. तिची क्रिस्टिना पिस्कोवा फाऊंडेशन नावाची संस्थाही आहे. तिने टांझानियामध्ये वंचित आणि शोषित घटकातील मुलांसाठी इंग्रजी माध्यमाशी शाळाही सुरू केली आहे.
6 वेळा जिंकला ताज भारताने आतापर्यंत सहा वेळा ‘मिस वर्ल्ड'चा ताज पटकावला आहे. रिया फारिया या 1966 ला मिस वर्ल्ड झाल्या होत्या. त्यानंतर 1994 ला ऐश्वर्या राय, 1997 ला डायना हेडन, 1999 ला युक्ता मुखी, 2000 ला प्रियंका चोप्रा आणि त्यानंतर 17 वर्षांनी 2017मध्ये मानुषी छिल्लर हिने ‘मिस वर्ल्ड'चा ताज जिंकला होता.
भारताची सिनी शेट्टी आठव्या स्थानावर मिस वर्ल्ड 2024 स्पर्धेत सहभागी झालेली भारताची स्पर्धक सिनी शेट्टी हिला या स्पर्धेत समाधानकारक कामगिरी करता आली नाही. सिनी शेट्टीला आठव्या स्थानावर समाधान मानवं लागलं. सिनी शेट्टी ही मूळची कर्नाटकची असून, तिचा जन्म 2 ऑगस्ट 2001 साली मुंबईत झाला आहे. सिनी शेट्टीचे वडील सदानंद शेट्टी यांचा मुंबईत हॉटेलचा व्यवसाय आहे.







