गायब झाला म्हणून ज्या पावसासाठी लोक प्रार्थना करीत होते, त्या पुन्हा सक्रीय झालेल्या पावसाने सर्वत्र उच्छाद मांडला आहे. किनारपट्टी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, रायगड, मुंबई, ठाणे व पालघर परिसरात धुवाधार पाऊस बरसला. गेल्या तीन-चार दिवसांपासून सतत पडणार्या मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. या विक्रमी स्वरुपाच्या पावसामुळे दुथडी भरुन वाहणार्या अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि सोमवारी सकाळपासून तेथील संपूर्ण परिसरात पाणी शिरले. नागोठणेप्रमाणेच या पावसाच्या उच्छादामुळे खालापूर तालुक्यातील जनजीवनही विस्कळीत झाले. याचे कारण, गेल्या 48 तासांमध्ये देशातील सर्वाधिक पाऊस रायगड जिल्ह्यातील उरण, तसेच ठाण्यात कोसळला. मंगळवारी पाऊस उघडल्याचे चित्र दिसले. तथापि, कमी दाबाचा पट्टा आणखी तीन दिवस, म्हणजे गुरुवार, शुक्रवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे सावधगिरी अजिबात सोडता कामा नये. असे म्हणण्याचे कारण, अनेक पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याने नुकसान होऊ शकते. तसेच विशेषत: तरुण वर्ग अशा वातावरणात अतिउत्साह दाखवत जीव धोक्यात घालण्याचा संभव असतो. तसे करणारे काही तरुण खारघर बेलापूर येथील पांडवकडा परिसरात अडकले होते. अशा शंभरहून अधिक जणांची सुटका करण्यात आली. मुंबईत अनेकांसाठी हा पाऊस काळ ठरला आणि पावसाने मोठ्या प्रमाणात बळी घेतले. मुंबई, ठाण्यासह कोकण तसेच आणि पश्चिम घाटांतही जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आदी भागांतही मुसळधार पाऊस कोसळला. कळवा येथील घोलाईनगरमध्ये सोमवारी दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. खोपोलीत पूर पाहण्यासाठी घराबाहेर पडलेले बहीण-भाऊ नाल्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे वृत्त आहे. तर, कर्जत तालुक्यातील कळंब येथील पोश्री नदीच्या पाण्यात एक 26 वर्षांचा तरुण वाहून गेला. बाळगंगा नदीला आलेल्या पुरामुळे खरोशी गावच्या लोकांना अनेक वर्षांपूर्वीच्या, म्हणे 1989 आणि 2006 सालच्या महापुराची आठवण झाली. या नदीकाठावरील घरात पाणी घुसल्याने सुमारे 40 घरांचे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरात पाण्याबरोबर माती व चिखल शिरल्याने परिस्थिती हतबल करणारी बनली आहे. अशा प्रसंगी वीज गायब असते. त्यातून अनेक गोष्टी अडतात, ती बाब वेगळीच. म्हसळा तालुक्यात मेंदडी येथे बोट पलटी होऊन एक तरुण कोळी बुडाला. माथेरान भागात डोंगरावरील माती दगडांसह खाली रस्त्यांवर अथवा वस्तीच्या परिसरात येण्याचे प्रकारही घडले. नेरळ-माथेरान घाट रस्त्यावर एक दरड कोसळल्याने घाट रस्ता वाहतुकीस बंद झाला. यावर्षीच्या पावसाळ्यात घाट रस्त्यात दरड कोसळण्याची दुसरी घटना आहे. या मुसळधार पावसामुळे उरण बुडाल्याचे चित्र दिसले. शहरात व अनेक गावाघरांत पाणी घुसून जणू पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. याव्यतिरिक्त शेतीचे नुकसान प्रचंड प्रमाणात झाले आहे. कारण, भातशेती ही पूर्ण पाण्याखाली गेली आहे, तर शेतात पेरणीसाठी उपटलेले राब पाण्याच्या प्रवाहात वाहात जाताना पाहण्याची नामुष्की शेतकर्यांवर आली आहे. खरे तर, जुलै महिन्याच्या मध्यास भातलागवड पूर्ण होत असते. मात्र, यावर्षी पावसाने आधी वेळेवर येण्याचे संकेत देत नंतर त्याचे आगमन खंडित झाल्यामुळे राब तयार होण्यास विलंब झाला. त्यानंतर लगबगीने लागवड सुरू होताच पावसाने उच्छाद मांडला. यामुळे बळीराजा चांगलाच चिंताग्रस्त बनला आहे. अद्याप जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत मुसळधार पाऊस कोसळतच असल्याने शेतीसोबत छोटे नाले आणि प्रदेश जलमय झाले. सगळीकडे गावातील ओहोळ आणि बंधारे दुथडी भरून वाहात असताना दिसत होते. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने धोक्याची परिस्थिती बनली. पाऊस ही नैसर्गिक घटना आहे. त्यावर सगळ्या देशाचे आणि जवळपास निम्म्या जगाचे पोषण आणि जीवनचक्र अवलंबून आहे. पावसाच्या स्वरुप आणि प्रमाणानुसार देशाच्या त्या वर्षीच्या प्रगतीचा आलेख ठरतो. मात्र, अलीकडे पायाभूत सुविधांकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष, दुरुस्ती, आपत्कालीन व्यवस्थांची वानवा, दीर्घकालीन उपाययोजनांकडे दुर्लक्ष, प्रशासन-कंत्राटदार यांच्यातील भ्रष्ट नाते आणि त्याला असलेला राजकीय व्यवस्थेचा वरदहस्त आदी कारणांमुळेदेखील अनेक ठिकाणच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. निसर्गाच्या असमतोलाला आपणही जबाबदार असतो. म्हणून पाऊस दरवर्षी अनियमित आणि अतितीव्र होत चालला आहे.
पावसाचा उच्छाद

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarahi newspapermarathi newsraigad
Related Content
दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी - भाग 1
by
Antara Parange
July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
by
Antara Parange
April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
by
Antara Parange
March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
by
Antara Parange
March 8, 2025