भारताचा कोहिनूर

भारताच्या स्वातंत्र्यानंतरची दोन दशके रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार तथा युसूफ खान यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनयाचे क्षेत्र पोरके झाले आहे. रुपेरी पडद्यावरील कोहिनूर म्हणून गणले जाणारे अभिनयाचे बेताज बादशाह आपल्यातून गेले आहेत. गेल्या अनेक दशकांत, त्यांच्यानंतर आलेल्या अनेक अभिनेत्यासाठी विद्यापीठ ठरलेले व्यक्तिमत्त्व हरपले आहे. पडद्यावरील आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने तोपर्यंतच्या अभिनय शैलीची चौकट मोडीत काढून आपली एक वास्तववादी, सखोल, अर्थपूर्ण आणि संपूर्ण देहबोलीचा वापर करून व्यक्त केलेला आशय अशी नवी चौकट प्रस्थापित केली. दिलीप कुमार यांनी निर्माण केलेल्या या चौकटीच्या बाहेर अद्याप कोणत्याही अभिनेत्याला जाता आलेले नाही. त्यांच्यानंतरचे सुपरस्टार देखील दिलीप कुमार यांच्या अभिनय शैलीचे वेगवेगळे पैलू होते. चित्रपटातील तोवरची नाटकासारख्या अभिनयाची परंपरा मोडीत काढून, मेलोड्रामाच्या शैलीला पूर्णविराम देऊन, काळजाला भिडणारी पात्रे संस्मरणीय करणारे नवे अभिनय तंत्र त्यांनी उदयास आणले आणि प्रस्थापित केले. त्यांच्या या योगदानाबद्दल व्हावे तसे संशोधन आणि अभ्यास आतापर्यंत झाला नसला तरी यापुढे नक्कीच व्हायला हवा. कारण त्यांनी पूर्ण आयुष्य घालून पात्रात जिवंतपणा आणण्याचा, त्याला पडद्यावर जिवंत करण्याचा जो प्रघात पाडला त्यातून चित्रपटसृष्टीला नवीन उंची मिळाली. 1950 चे दशक आणि त्यानंतरचे 60 चे दशक हे दिलीप कुमार यांच्यासाठी निर्णायक होते. याच काळात त्यांच्या नैराश्यपूर्ण, शोकांत अशा प्रकारच्या भूमिकांमुळे त्यांना ट्रॅजेडी किंग अर्थात शोकनायक असेही नाव दिले गेले. ते देवदास या चित्रपटासाठी त्या नावाने ओळखले गेले. भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिले खान आणि पहिला सुपरस्टार गणले जाणारे दिलीप कुमार यांनी या शोकांत भूमिकेत स्वतःला इतके उतरवले होते की त्यांना व्यक्तिगत जीवनातही नैराश्याने ग्रासले आणि त्यानंतर मानसशास्त्रज्ञांच्या सल्ल्याने त्यांनी काही हलके फुलके रोल करायला घेतले. खरा अभिनेता हा सर्वच भूमिकांना तितकाच न्याय देत असतो, हे दिलीप कुमार यांनी सिद्ध केले. यांच्यातील विनोदी पैलूही त्यांनी तितक्याच समर्थपणे पुढे आणला. त्यांचे चित्रपट पाहताना एकेका मिनिटावर हजार हजार शब्द लिहावेत अशा प्रकारचा अनुभव त्यांनी गंगा जमुना, मुगले आझ्म, नया दौर अशा त्यांच्या मैलाचे दगड ठरलेल्या चित्रपटातून दिला. चित्रपट हा व्याख्येनुसार पाहण्याची गोष्ट आहे, ऐकण्याची नाही, त्यामुळे अभिनेत्याने कमी बोलले पाहिजे आणि जास्ती दाखवले पाहिजे हे यावर त्यांची निष्ठा होती. त्यासाठी संपूर्ण चेहरा बोलका हवा. केवळ ओठ आणि डोळे नव्हेत, तर भुवया, कपाळ, गाल, हनुवटी या सगळ्यांचाच उपयोग अभिनयासाठी असतो, हे दाखवून देणारे ते पहिलेच. त्यांची याबाबतीत त्यांच्यासारखी उंची गाठू शकणारे फारच कमी. अभिनय क्षेत्रातील सर्वाधिक अभिनेत्याची अनेक, विक्रमी पारितोषिके आणि मानसन्मान त्यांना मिळाले. गंगा जमुना, नया दौर, मुगले आझम मधल्या भूमिकेसाठी, मधुमती, राम और शाम, यहुदीतील भूमिकेसाठी ते पन्नास वर्षांनंतरही आठवतात. तसेच, त्यानंतर वयाच्या साठीत त्यांनी चित्रपट क्षेत्रात पुनरागमन केल्यानंतर क्रांती, विधाता, सौदागर, शक्ती, मशाल या चित्रपटातून त्यांच्यातील अभिनय अजून किती बाकी आहे ते दिसले. मशाल चित्रपटातील हताशपणे रात्री एकटा रस्त्यात बायकोसाठी मदत मागणारा, कोई है अशी आर्त हाक देणारे नायक हे दृश्य कायमस्वरूपी चितारले गेले आहे. अशी असंख्य दृष्ये सांगता येतील. माणूस जन्माला आला की त्याला एक दिवस शरीर त्याग करावाच लागतो, पण तो काय संचित मागे ठेवून जातो हे त्याचे खरे योगदान असते. दिलीप कुमार यांनी पुढच्या अनेक पिढ्या प्रेरित होतील, अभ्यास करतील आणि अभिनय क्षेत्रात नवी शिखरे गाठतील यासाठी पुरेसा ऐवज मागे ठेवला आहे. त्याचा योग्य उपयोग करणे ही त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरणार आहे. निधनानंतर कलावंतांनी एक्झिट घेतली असे म्हणायची पद्धत आहे. परंतु दिलीपकुमार कधीही रसिकांच्या मनातून एक्झिट घेऊ शकत नाहीत, कारण ते अमर आहेत, ते अमरच राहतील.

Exit mobile version