जबाबदारी हवी

दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूने सगळ्या जगाला पांघळे केले आणि दोन वर्षें लॉकडाऊनमध्ये घालवायला लावून जगभरातील सगळ्यांच्या जीवनाची गती रोखली. त्यातून प्रामुख्याने लसीकरणाच्या माध्यमातून मात करून तिसर्‍या लाटेची संभाव्य भिती खोटी ठरवून महिनाभरात सुरू होणारे 2022 साल हे खर्‍या अर्थाने नवे आणि कोरोनामुक्त अर्थव्यवस्थेचे असेल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र या आशावादाबद्दल नुकत्याच आढळलेल्या एका नवीन व्हेरीयन्टने मोठी शंका उपस्थित केली आहे. या ओमीक्रोन नावाने ओळखले जाणारे हे नवे व्हेरीयन्ट नेमके काय आहे, किती प्रसारीत झाले आहे, त्याचे परिणाम काय व किती आहेत, याबाबत कोणतीही माहिती अद्याप हाती लागलेली नाही. तरीही त्याबद्दल रोज नवे दावे आणि रोज नवी भाकिते करण्यात येत आहेत. अर्थात माणसाची मूळप्रवृत्ती ही भयगंडाचीच असल्याने कोणत्याही प्रकारच्या नवीन संकटाने तो आधी भीतीने कोलमडतो, हे सत्य आहे. त्यात या कोरोनाने जगभरात गेल्या पावणेदोन वर्षांच्या साथीच्या काळात सुमारे पन्नास लाख लोकांचे प्राण घेतले आहेत. या मरणाच्या छायेत असंख्य लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जगलेले आहेत. पहिल्या लाटेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही तज्ज्ञांशी चर्चा न करता आणि कोणतीही पूर्वतयारी न करता कोरोनाच्या प्रत्यक्ष लाटेपेक्षा भीषण ठरलेल्या चार महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये डांबले. त्यात कोरोना न झालेल्यांना देखील अभूतपूर्व अशा भीषण अनुभवांतून जावे लागले. अनेक मजूर देशोधडीला लागले आणि असंख्यजण मागे परतताना मरण पावले. हा इतिहास ताजा आहे आणि त्याबद्दलचे वृत्त ऐकलेल्या आणि त्या अनुभवांतून गेलेल्यांना अर्थातच तसे पुन्हा नको आहे. त्यानंतर पहिल्या लाटेचा भर ओसरल्यावर लॉकडाऊनचे निर्बंध सैल झाल्यानंतर स्थिती पूर्वपदावर येत आहे असे वाटत असताना पुन्हा दुसर्‍या लाटेच्या भरात लोकांना पुन्हा असे निर्बंधयुक्त आयुष्य जगावे लागले. त्यात एका बाजूला जगण्याचा, टिकून राहण्याचा झगडा होता, तसेच दुसरी लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक भीषण असल्याने आणि सरकारांची पूर्वतयारी कमकुवत असल्याने खूपच भीषण परिस्थिती देशात निर्माण झाली. त्याची काही चित्रे मनाच्या पटलावर कायमची कोरली गेलेली आहेत. त्यात स्मशानात लागलेल्या प्रेतांच्या लांबलचक रांगेपासून गंगेतून आणि त्याच्या किनार्‍यावर गाडलेल्या हजारों प्रेतांची चित्रे आहेत. त्यात अनेक ठिकाणी प्राणवायुचा तुटवडा निर्माण होऊन उपचार घेणारेही मृत्यूमुखी पडले. त्यावेळी प्राणवायू हे नाव तसे का आहे हे अनेकांना कळले. मात्र प्राप्त परिस्थितीपुढे गरीब आणि श्रीमंत दोघेही हतबल झाले. श्रीमंतांसाठी काही गोष्टी सोप्या होत्या तरी कालांतराने भीषण वातावरण सगळ्यांना सारखेच ग्रासले. तो अनुभवही लोकांना अतिशय ताजा आहे. त्यामुळे त्यांना तसे पुन्हा होऊ नये असे वाटते, ते समजण्यासारखे आहे. तशात तिसर्‍या लाटेची आणि ती खूप भीषण असेल अशी भिती दाखवली जात होती. ती फोल ठरली. कारण आपण त्या काळात मोठ्या प्रमाणात लसीकरणाबाबत वेग घेतला होता. त्यात केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाव्यतिरिक्त अनेक संस्थांनी पुढे येऊन लसीकरण वेगात पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न केले, त्यांना यशही आले. तिसरी लाट येण्याची शक्यता मावळली आणि अर्थव्यवस्थाही सावरली. दिवाळीनंतर सगळीकडे मुक्त व्यवहार होऊ लागल्याने आशादायक वातावरण निर्माण झाले. त्यात अर्थव्यवस्थेच्या वाढीचे आकडे आशादायक दिसू लागले आणि लोकांचे दळणवळण, फिरणे पूर्वपदावर येऊ लागले आणि आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवर स्थिती कोरोनापूर्व होत असल्याचे दिसू लागले. तथापि, या नवीन ओमीक्रॉन व्हेरीयंटने या आशेवर पाणी फिरवण्याचे ठरविले आहे की काय असे वाटू लागले. दूरचित्रवाणीतील वार्तापत्रे ही माणसाच्या मनातील भयगंड जागृत करून त्याचे पोषण करू पाहात आहेत आणि त्यामुळे नित्यनेमाने वेगवेगळे लोक अनेक पद्धतीने हा व्हेरीयंट कसा धोकादायक आहे, असे सांगत आहेत. दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम हा नवीन प्रकार ज्यांनी शोधून काढला त्या वैज्ञानिकांच्या मते तो अत्यंत सौम्य असून कोणतेही उपचार न करताही बरा होऊ शकतो. तो घातक आहे असे सिद्ध होण्यासाठी थोडी वाट पाहायला हवी. मात्र सगळीकडे नुकतीच किलकिली केलेली दारे बंद करण्याकडे कल वाढत आहे. त्याचे घातक परिणाम समोर आल्यास काय करावे याचा वस्तुपाठ आपल्याला आहेच. आपण अधिक तयार आहोत. मात्र संकट कळण्याआधी घाबरणे काही योग्य नाही.

Exit mobile version