प्रादेशिक साहित्य सन्मान

साहित्यासाठी देण्यात येणारा देशातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार 2022 सालाकरिता गोव्यातील कोंकणी भाषेतील ज्येष्ठ लेखक दामोदर तथा भाई मावजो तसेच प्रसिद्ध आसामी कवी आणि साहित्यिक नीलमणी फुकन यांची निवड करण्यात आल्याने देशातील प्रादेशिक भाषांतील साहित्य योगदानाचा सन्मान झाला आहे. दामोदर मावजो हे कथा, कादंबरीकार आहेत तर नीलमणी फुकन हे कवी आणि कला समीक्षक आहेत. दोघांचाही यापूर्वी त्यांच्या साहित्य निर्मितीबाबत राष्ट्रीय पातळीवर साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मान झाला आहे. गोव्यातील कोंकणी भाषेच्या आंदोलनाच्या दृष्टीने हा सन्मान महत्त्वाचा आहे. यापूर्वी 2006 सालचा पुरस्कार ज्येष्ठ कोंकणी लेखक रवींद्र केळेकर यांना देण्यात आला होता. त्यांनी महाभारत कोंकणीत आणण्याचे मोठे काम केले होते. आता हा सन्मान गोव्यातील विविध समुदायांत, सांस्कृतिक भवतालात निर्माण होत असलेल्या नातेसंबंधांच्या गुंत्यांचा मर्मभेद करणार्‍या साहित्याची रचना करणारे भाई मावजो यांना देण्यात आला आहे. तसेच, आसाममधील आदिवासी आणि लोककलांचे आघाडीचे कला समीक्षक असलेल्या नीलमणी फुकन यांच्या आसामी काव्याच्या सहज आविष्कारासाठी सन्मान केला गेला आहे. हिंदी, तमिळ, उर्दू, कन्नड, बंगाली आणि अर्थात मराठी आदी भाषांच्या प्रभावाखाली काही वेळा अन्य भाषांतील साहित्यातून होत असलेले कार्य दुर्लक्षित राहते. अनेक वर्षे इंग्रजी भाषेला यापासून दूर ठेवले गेले आणि देशी भाषांचा प्राधान्याने या पुरस्कारांसाठी विचार केला गेला. तथापि दोन वर्षांपूर्वी तीही भिंत पाडली गेली आणि अमिताव घोष या प्रामुख्याने इंग्रजीतून दीर्घकाळ एकाहून एक सरस कादंबर्‍या लिहिणार्‍या लेखकाला ज्ञानपीठ देऊन सन्मान करण्यात आला. गोव्याची भाषा कोंकणी आहे; रस्त्यावर दोघे भेटले तर ते कोंकणीतच बोलतात. मात्र त्याचबरोबर तितक्याच प्रमाणात तेथे मराठीही आहे. तेथे प्राथमिक शिक्षण मराठी आणि पोर्तुगीज भाषेतून त्यांनी घेतले व पुढे ते मुंबईत आले. गोवा आणि मुंबई यांच्यातील नाते प्रदीर्घकाळ अनेक साहित्यिक, सांस्कृतिक घडामोडींना आकार देणारे ठरले आहे. असंख्य कलागुणांची खाण असलेल्या गोव्याचा मुंबईशी अनेक अर्थांनी संबंध आहे. भाई मावजो हेही त्या काळी अनेकांप्रमाणे महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईत आले आणि त्यांनी माटुंग्यातील पोद्दार कॉलेजमधून मुंबई विद्यापीठाची पदवी मिळवली. हा संदर्भ एवढ्यासाठीच महत्त्वाचा की या मुंबईच्या मुक्कामात त्यांनी आपली पहिली कोकणी भाषेत  लिहिली. या कथांना वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि यापैकी काही इंग्रजीतही अनुवादित झाल्या. लहानपणी वडिल गमावलेल्या मावजो यांनी आपल्या काकांना त्यांचे मडगाव येथील दुकान चालवायला मदत केली आणि शिक्षणानंतरही ते तेथे काम करू लागले. त्यांचा जन्मगाव माजोर्डे आणि मडगाव हे साष्टी तालुक्याची मुख्य केंद्रे. तसेच तेथे हिंदू आणि ख्रिस्ती यांची संख्याही तुल्यबळ. तेथे त्यांनी आपल्या भोवतीच्या जगाचे बारकावे टिपले आणि या लोकांचे जीवन आपल्या साहित्यात आणले. गोव्यातील ख्रिस्ती लोकांच्या जीवनाचे अस्सल चित्रण त्यांच्या लेखानात प्रभावीपणे दिसून आले. आजपासून पन्नास वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या त्यांच्या गांथण या पहिल्या कथासंग्रहापासून त्यांनी साहित्यात आपली छाप सोडायला सुरुवात केली. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर नाव मिळवले ते त्यांनी लिहिलेल्या कार्मेलिन या कादंबरीनंतर. या कादंबरीला 1083 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्याहूनही ही कादंबरी जनमानसांत कमालीच्या चर्चेची ठरली. त्यातून वादही झाले आणि आक्षेपही नोंदवण्यात आले. ही कादंबरी आखाती देशांमध्ये काम करणार्‍या गोव्यातील कामवाल्यांच्या दुःखाला आणि लैंगिक शोषणाला प्रकाशात आणणारी होती. असे विषय आणि त्यासंबंधीची धाडसी मांडणी त्यांनी केली आणि त्यांच्या या विषय आणि चर्चेबाबत जे आक्षेप आणले गेले ते काळानेच सोडवले. आज ते सर्वश्रुतच झाले नाही तर अनेक कलाकृतींतून व्यक्तही होऊ लागले. या कादंबरीचा 12 भाषांत अनुवाद झाला आणि भाई मावजो या नावासोबत या इवल्याशा वाटणार्‍या राज्यातील व्यक्तिगत दु:ख वैश्‍विक झाले. अत्यंत विनयशील असलेल्या भाई मावजो यांच्यात एक सक्रीय, जागृत आणि तरुण बंडखोर लपलेला आहे, हेही वेळोवेळी सिद्ध झाले आहे. लेखकाने बोलले पाहिजे, मुस्कटदाबीच्या विरोधात उभे राहिले पाहिजे, या भूमिकेतून त्यांनी दक्षिणायन आदी मोहिंमांद्वारे सक्रीय सहभाग घेतला. असो. कोंकणी साहित्यात नवे धुमारे फोडणारे मावजो आणि आसामी कवितेला आधुनिक रूप बहाल करणारे फुकन या दोघांना क्षानपीठ पुरस्कार दिला गेल्याने देशाच्या वैविध्यपूर्ण आविष्काराचा सन्मान झाला आहे, हे नक्की.

Exit mobile version