2021 वर्ष संपत आले असल्याने नव्या वर्षाच्या चाहुलीने सगळे उत्साहात आलेले आहेत. यंदा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आबालवृद्ध आतूर आहेत. तरुण तर या निमित्ताने पार्ट्या करायला उत्सुक असतातच, शिवाय या निमित्त अन्य लोकही 31 डिसेंबरच्या रात्री मोठ्या जल्लोषासाठी सिद्ध होतात. मात्र सध्या कोरोना संसर्गाचा नव्याने धोका वाढत असल्याने कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी येऊन पार्टी करु नये असे आवाहान राज्य सरकारकरडून केले जात आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली करणार्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याचा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. त्याच वेळी जागतिक आरोग्य संघटनेने आता धोक्याचा इशारा देत डेल्टा आणि ओमिक्रॉन हे एकत्रितपणे दुप्पट धोकादायक असल्याचे म्हटले आहे. डेल्टानंतर आलेला ओमिक्रॉन यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढत असल्याचा त्यांचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी आपली काळजी घेत सार्वजनिक ठिकाणी सावधानता बाळगायला हवी यात शंका नाही. जगभरात कोरोनाचा नव्याने उद्रेक सुरू झाला असून तो वेगाने पसरू लागल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 28 कोटींचा टप्पा पार केला असून आतापर्यंत 54 लाखांहून अधिक जणांनी आपला जीव गमावला आहे. आतापर्यंत कोरोना लाटेवर लसीकरणातून मात केल्याची भूमिका असलेले प्रगत देश पुन्हा कोरोनापुढे हतबल होताना दिसत असून चीनसह अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात जागतिक रुग्णसंख्येत सुमारे 11 टक्क्यांनी वाढ झाली असून अमेरिका आणि फ्रान्समध्ये बुधवारी सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली. यात आता नव्याने आलेल्या ओमिक्रॉन व्हेरीयंटने सगळेच चक्रावलेल्या मन:स्थितीत आहेत. त्या आधी आलेल्या डेल्टा व्हेरीयंट अजून आहे आणि आता ओमिक्रॉनने त्यात भर घातलेली आहे. म्हणजे एक व्हेरीयंट गेला आणि त्याच्या जागी दुसरा आला असे नाही, तर आधीचा गेलेला नाही आणि त्यात नवीन व्हेरीयंटची भर पडलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, हे दोन्ही व्हेरीयंट मिळून येत्या काळात कोरोनाची मोठी लाट येऊ शकते. आणि आता रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाटू शकणारी भर दररोज टाकली जात असताना त्यांनी गंभीर इशारा दिला आहे. या दोन्ही व्हेरीयंटचा प्रचंड ताण येत्या काळात आरोग्य यंत्रणांवर पडेल, असे त्यांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर या तणावामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडेल असाही इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे साहजिक भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. कारण लसीकरणाच्या आधारे कोरोनावर पूर्णत: नियंत्रण आणता येईल अशी अपेक्षा असतानाच कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने आव्हान निर्माण केले आहे. ही चिंता नेमकी नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच निर्माण झाल्याने सगळ्यांची पंचाईत झालेली आहे. कारण गेल्या वर्षी अशा प्रकारे उत्साहात नववर्षाचे स्वागत करणे जमलेले नव्हते. जगभर ख्रिस्तमस पासून नववर्षापर्यंत असा एक आठवडा मोठी सुट्टी असते आणि लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात, प्रवासाला जातात. भारतात तसेच महाराष्ट्रातही सगळे जण उत्साहाने योजना आखत होते. हॉटेल आणि अन्य ठिकाणीही त्या त्या व्यवस्थापनांनी जोरदार तयारी केली होती. मात्र ख्रिसमस पासून लोकांनी गर्दी केल्यामुळे आणि बाधितांत सरमिसळ झाल्याने अनेक जण बाधित झाले. त्यांची संख्या सुरुवातीला किरकोळ वाटत असली तरी वेगाने दुप्पट होऊ लागली. तरीही उत्साहात असलेल्या लोकांनी गर्दी कमी केली नाही आणि संख्या वाढायला लागली. मंत्रीही बाधित झाले आणि आमदारही. त्यामुळे राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नववर्षाच्या उत्साहाला रोखण्यासाठी पावले उचलली आणि पहिल्यांदा रात्री नऊ ते सकाळी सहा अशी संचारबंदी जारी केली. त्यानंतर आता सर्व ठिकाणी गर्दी करण्याला आणि विशेषत: पार्टी करणार्यांवर निर्बंध आणलेले आहेत. तशाच सूचना जागतिक आरोग्य संघटनेनेही केल्या असून नववर्ष आगमनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी करू नये असे राज्य सरकारनेही म्हटले आहे. पार्टी करण्यासाठी पूर्ण वर्ष आहे. मात्र सध्या कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन कुटुंबियांसोबत नव्या वर्षाचे स्वागत करावे असे म्हटले आहे. आपण सावधानता बाळगणे आवश्यक आहे. पोलिसांना कठोर कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेतच, मात्र आपण आतापर्यंतचा दोन लाटांचा अनुभव आठवून आपल्या उत्साहाला आपल्या घरापर्यंत मर्यादित करण्याची गरज आहे.
सावधानता हवी!

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
रायगड जिल्ह्याचा ‘एनसीसी मॅन’ हरपला; शेकाप नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या भावना
by
Antara Parange
June 6, 2026
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026