उदगीर येथे येत्या मार्चमध्ये होणार्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांची बिनविरोध निवड साहित्य परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सासणे यांचे अभिनंदन. मराठी वाङ्मयाला शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे. संत साहित्यापासून आजच्या साहित्यक्षेत्राचा आढावा घेतला तर मोठ्या प्रमाणात दर्जेदार साहित्य निर्माण झालेले आहे. या वाङ्मयामुळे मराठी भाषा खरोखरच प्रगल्भ झालेली आहे. मराठी भाषेवर अन्य भाषांचे आक्रमण होत असले तरी त्या परकीय भाषांना थोपवून धरण्याची ताकद निश्चितच मराठी भाषेत, मराठी वाङ्मयात आहे हे कुणीही नाकारु शकत नाही. त्यामुळे साडेसातशे वर्षापूर्वी इंद्रायणी काठी जन्मलेल्या संत ज्ञानोबांनी देखील माझ्या मराठीचा ‘बोलू कवतूक, परि अमृतातही पैजा जिंके’ असे मोठ्या अभिमानाने लिहून ठेवले आहे. मराठी वाङ्मयाचा प्रसार आणि प्रचार व्हावा या हेतूने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची संकल्पना मांडून ती सुरु करण्यात आली. त्या घटनेला आता 95 वर्षे होत आहेत. नुकतेच नाशिक येथे झालेले 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देखील अमाप उत्साहात संपन्न झालेले आहे. राज्यात कोरोनाची गंभीर स्थिती असतानाही आयोजकांनी अत्यंत उत्साहात हे संमेलन साजरे केले. यामुळे साहित्य चळवळीला प्रोत्साहन मिळाल्याचे दिसून आले. याच संमेलनात ग्रंथ प्रदर्शनाला देखील वाचकांनी अमाप प्रतिसाद दिला. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांची अविरोधी निवड करण्यात आली होती.पण प्रकृतीच्या कारणामुळे डॉ.नारळीकर हे प्रत्यक्ष संमेलनस्थळी उपस्थित राहू शकले नाहीत. वास्तविक संमेलनाध्यक्ष हा या साहित्य उत्सवाचा मुख्य अतिथी असल्याने त्यांचे विचार प्रत्यक्षपणे ऐकण्यात एक वेगळाच आनंद असतो. आतापर्यंत जी जी साहित्य संमेलने झाली त्यात त्यावेळचे साहित्यसंमेलनाध्यक्ष हे आधीपासूनच कार्यक्रम स्थळी उपस्थित राहत असत.पण नारळीकर यांनी प्रकृतीचे कारण देत संमेलनास प्रत्यक्षात उपस्थित राहणे टाळले.त्यामुळे संमेलनाध्यक्ष हा संमेलनास प्रत्यक्ष उपस्थित राहणारा असावा असा सूर साहित्य परिषदेने लावला.तो योग्यच म्हटला पाहिजे. म्हणून यावर्षी मार्चमध्ये होणार्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांची अविरोध निवड करण्यात आली. सासणे हे चार दशके मराठी वाङ्मयीन क्षेत्रात कार्यरत आहेत. आतापर्यंत भारत सासणे हे वैजापूरला झालेल्या 5 व्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते. बहिर्जी शिक्षण संस्थेतर्फे वसमत येथे आयोजित केलेल्या 35 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील भारत सासणे यांच्याकडे होते. याशिवाय नाशिकच्या उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेचे जळगाव येथे या एक दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे समारोपीय सत्राचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं आहे. सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने समग्र साहित्य सेवेबद्दल सूर्योदय पुरस्कार देऊनही सासणे यांना गौरवण्यात आलं आहे.सासणे यांनी अदृष्ट, अनर्थ रात्र, अस्वस्थ, विस्तीर्ण रात्र (सर्व दीर्घकथा संग्रह), आतंक, मरणरंग, बंद दरवाजा, राहीच्या स्वप्नांचा उलगडा, लाल फुलांचे झाड, शुभ वर्तमान आदी ग्रंथसंपदा लिहिली आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रात त्यांनी वेगळा ठसा उमटविला आहे. आता मानाच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड करुन साहित्य परिषदेने त्यांच्या वाङ्मयीन सेवेचा यथोचित सन्मानच केलेला आहे. सासणे हे सुद्धा संमेलनाध्यक्ष या नात्याने निश्चितच या पदाला न्याय देतील. साहित्य संमेलनाध्यक्ष होणे हे साहित्यिकांसाठी एक भूषणच असते. त्यामुळे या पदावर कार्यरत असताना साहित्य चळवळ आणखी कशी वृद्धींगत होईल याकडे सासणे हे लक्ष देतील यात तीळमात्र शंका नाही. महाराष्ट्रात वाङ्मयावर आणि ते वाङ्मय लिहिणार्या साहित्यिकांवर उदंड प्रेम, आदर करणारे असंख्यजण आहेत. आतापर्यंत जे जे साहित्यिक संमेलनाध्यक्ष झाले त्यांचा महाराष्ट्रातील जनतेने नेहमीच गौरव केलेला आहे.सासणे यांचाही असाच गौरव साहित्यप्रेमी करतील. शेवटी आपली साहित्य संस्कृती टिकविण्याची जबाबदारी जशी साहित्यिकांची आहे. तशीच ती वाचकांदेखील आहे. यासाठी दर्जेदार साहित्य निर्मिती होत रहावी साहित्यिक आणि वाचक म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांचे हे नाते भविष्यात असेच वृद्धींगत व्हावे, ही सरस्वतीचरणी प्रार्थना.






