जो जिता वही सिकंदर

मैदान कुठलेही असो मग ते खेळाचे असो वा राजकीय. त्या मैदानावर, आखाड्यात जो जिंकतो तोच खरा सिकंदर असतो. यावरुनच जो जिता वही सिकंदर असं मोठ्या अभिमानाने बोलले जाते. बुधवारी झालेल्या राज्यातील 106 पैकी 97 नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप यांची महाआघाडी विरुद्ध भाजप असाच सामना झाला. अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केले. या निवडणुकीत भाजपने 384, राष्ट्रवादी 344, काँग्रेस 316 तर शिवसेना 284 जागा जिंकल्या आहेत.तर 97 पैकी 17 शिवसेना, 27 राष्ट्रवादी, 22 भाजप, 21 काँग्रेस आणि 10 इतर स्थानिक आघाड्यांनी नगरपंचायती जिंकल्या आहेत. आता निवडणुका झाल्यावर सर्वच राजकीय पक्षांनी आपलाच पक्ष एक नंबर असल्याचा दावा, प्रतिदावा करण्यास सुरुवात केलेली आहे. अर्थात त्यात गैर असं काहीच नाही. कारण लोकशाहीत असे दावे, प्रतिदावे लोकशाहीच्या माध्यमातून करण्याची परंपरा महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने रुजली आहे.हे प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण म्हटले पाहिजे. या निवडणुकीत जी काही युवाशक्ती दिसून आली. त्यात माजी उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांची कामगिरी सरस ठरली. वयाची पंचविशी गाठत असतानाच रोहितने कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणण्याची किमया केलेली आहे. स्व.आर.आर.पाटील हे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके नेते होते. दुर्दैवाने त्यांचे आकस्मिक निधन झाले. पण आता त्यांची जागा भरुन काढायला त्यांचा नवा वारसदार तयार झाला हे या निवडणुकीतून दिसून आले. अशी अनेक उदाहरणे देता येतील. प्रत्येक निवडणुकीत एखादा चांगला नेता तयार होतो. समाजाला अशाच नेत्याची आज गरज आहे. आता निवडणुका झाल्यात. त्यामुळे विजयी झालेल्या सर्वच पक्षांनी, विजयी उमेदवारांनी आपापल्या नगरींच्या विकासासाठी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. कारण ज्या विश्‍वासाने मतदारांनी तुमच्या हाती आपल्या नगरीची सत्ता सोपविली आहे त्या विश्‍वासाला तडा जाऊ न देता नगरवासियांनी मुलभूत नागरी सुविधा कशाप्रकारे पुरविता येतील याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला विजयी झाल्याचे आणि मतदारांनी आपण चांगला उमेदवार निवडून दिल्याचे समाधान मिळेल. वाढत्या नागरीकरणामुळे राज्यात नगरपंचायतींची निर्मिती करण्यात आली. गेल्या पाच वर्षात या नगरपंचायतींचा अपेक्षित विकास करण्यात अनेकजण यशस्वीही झाले.त्याचे फळ त्यांना या निवडणुकीत निश्‍चित मिळाले असेलच.पण ज्यांनी काहीच केले नाही, अशा सत्तालोलूप मंडळींना याच मतदारांनी घरी बसविले हे विसरुन चालणार नाही.त्यामुळे नव्याने विजयी झालेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी नगरपंचायतींचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही खूणगाठ मनाशी बाळगणे गरजेचे आहे. तरच पुढील पाच वर्षानंतर होणार्‍या निवडणुकीत याच मतदारांकडे तुम्ही हक्काने मतदान मागू शकाल. दर्जेदार विकासकामे करुन नगरपंचायतींचा सर्वांगीण विकास साधणे हेच ध्येय आता नवनिर्वाचित नगरसेवकांनी उराशी बाळगणे गरजेचे आहे. आजही अनेक नगरपंचायतींमध्ये विकासनिधी आलाय पण त्याचे नियोजन झालेले नाही, अथवा खर्ची पडलेला नाही असे आढळून आलेले आहे. त्यामुळे निदान पुढील पाच वर्षात तरी जे सत्तेवर आरुढ होणार आहेत त्यांनी प्रामाणिकपणे काम करुन नगरपंचायतींमधील नागरिकांना मुलभूत आणि दर्जेदार सुविधा पुरविण्यावर भर देणे गरजेचे आहे. आज मतदारही सुजाण झालेला आहे. पक्षाशी बांधिलकी जोपासणारा मतदार वेगळा आहे. त्याचबरोबरच डोळसपणे पाहणारा मतदारही मोठ्या प्रमाणात राज्यात आहे. तो मतदार निवडणुकीत एकच दिवस राजा असतो पण त्याच्या एका मताने एखाद्याचे राजकीय अस्तित्व नष्टही करुन टाकतो, अथवा एखाद्या चांगल्या नवोदिताला समाजसेवा करण्याची संधीही देतो. अशी संधी यावेळी अनेक युवक, युवतींना मिळालेली आहे. या संधीचा फायदा चांगल्या कामासाठी करुन मतदारांचा विश्‍वास संपादित करुन नवोदितांनी नव्या जोमाने कामास प्रारंभ करावा. निवडणुका होतात. त्यातून अपेक्षित, अनपेक्षित निकालही लागतो. पण जनतेने दिलेला कौल शिरोधार्थ मानून आपल्या कामास सुरुवात करावी, एवढीच माफक अपेक्षा. 

Exit mobile version