कलावंत आणि भूमिका

कलावंत आणि तो करत असलेल्या भूमिका याच्याशी त्याचे नाते काय असावे हा मुद्दा अनेकदा चर्चेत आला आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी साकारलेली गोडसेची भूमिका पुन्हा एकदा हाच वाद निर्माण करीत आहे. त्याबद्दल दोन मुख्य प्रवाह आहेत. पहिला असे मानतो की अमोल कोल्हे हा एक अभिनेता आहे. आणि अभिनेत्याला त्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले पाहिजे. नट म्हणून अमोल कोल्हे ही फक्त एक भूमिका करीत आहे. याचा अर्थ कोल्हे यांना गोडसेंबद्दल आदर आहे, असे अजिबात नाही. कारण हा देश जसा कीर्तनाने सुधारला नाही तसा तमाशाने बिघडला देखील नाही. खुद्द कोल्हेंनी केलेल्या खुलाशानुसार सदर चित्रपट 2017 मध्ये आला होता आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश 2019 मध्ये केला. आपण नथुरामचे समर्थन करत नसून केवळ कलाकार म्हणून हे आव्हानात्मक काम आपण स्वीकारले असे त्यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या भूमिकेची पाठराखण केलेली आहे. या युक्तिवादात निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू यांनी आपल्या हयातीत बलात्कार करणार्‍या अभिनेत्याची भूमिका केली याचीही उदाहरणे दिली जात असून ‘आणि मग त्यांना आयुष्यभर स्त्रीची प्रतिष्ठा मान्यच नव्हती असे म्हणणार का?’ असा सवालही उपस्थित केला जात आहे. काहींनी यात निर्माता, अभिनेता यांच्या भूमिका आणि आर्थिक बाजू याचीही मांडणी केली आहे. 2017 मध्ये सदर भूमिकेचे शूटींग झाले आणि 2019 मध्ये कोल्हे खासदार झाले. तोपर्यंत ते एक पोटार्थी अभिनेते होते. आता खासदार झाले म्हणून तेव्हा शूट केलेल्या चित्रपटाबद्दल निर्णय घ्यायला ते काही चित्रपटाचे निर्माते नाहीत. त्यामुळे आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाशी कोल्हेंचा संबंध नाही, असाही विचार व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे कोल्हे यांनी घोडचूक केली अशी टीका केली जात असून आपली चूक कबूल करून सुधारण्याचा मार्ग त्यांनी अवलंबायला हवा असे सांगितले जात आहे. कारण या चित्रपटाचा उद्देश वेगळा आहे. नथुराम माथेफिरू आतंकवादी होता अशी प्रतिमा निर्माण केली गेली आहे. प्रत्यक्षात त्याला गांधींचा खून का करावा लागला, हे समजून घेतलं पाहिजे. नथुरामचं न्यायालयातील स्टेटमेंट वाचल्यावर तो ‘अग्रणी’ दैनिक चालवणारा पुण्यातला स्वातंत्र्यसेनानी आणि समाजसेवक होता, हे लक्षात येईल, अशी दिग्दर्शकाची भूमिका आहे. असे असताना एका खुनी, माथेफिरू दहशतवादी व्यक्तीला एका वलयांकित स्वरूपात सादर करून त्याची खुनाची कृती कशी योग्य होती असे उदात्तीकरण करण्यात सामील होणे हे काही अजाणपणे झालेले असू शकत नाही. अमोल कोल्हेंनी नथूराम केल्याने ते नथूराम होत नाहीत हे खरे आहे. पण ते संभाजीची भुमिका केल्याने संभाजी महाराज देखील होत नाहीत. पण ते केवळ या भूमिकेतून राष्ट्रवादी पक्षाचे खासदार झाले, ते तरी तसे कसे काय होऊ शकतात? त्यामुळे त्यांची ही कलावंत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ढाल घेऊन त्यामागे लपण्याऐवजी आपली वैचारिक भूमिका स्पष्ट करावी. सगळ्याच लाभाच्या दगडावर पाय ठेवून मतलब साधताना आपण अन्य कोणत्या प्रकारच्या मूल्याच्या नरड्यावर पाय ठेवतो हेही लक्षात घेतले पाहिजे. ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक नरहर कुरुंदकर यांनी कलावंताना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असले पाहिजे या वाक्याचा अर्थ स्पष्ट केला होता. जे स्वतःला कलावंत मानतात, त्यांना ते ज्याला कला समजतात ती समाजासमोर ठेवण्याचे अबाधित स्वातंत्र्य असले पाहिजे असा आपला समज आहे, पण आपण तसे करणार का? कारण तसे आपण मानले तर कृत्रिमरित्या व्यक्तीच्या वासना उत्तेजित करण्याचा उद्योग घाऊकपणे जे करतील त्यांनाही अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क मिळेल. आणि वासना उत्तेजित करणे हा जर काही जणांचा चरितार्थ चालण्याचा समर्थनीय उद्योग मानला तर त्याचे परिणाम अत्यंत भयावह होतील. अशी जाणीव त्यांनी करून दिली होती. म्हणजे कलावंतांना आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबर ते कशासाठी याचेही जबाबदार भान ठेवावे लागते असा याचा अर्थ आहे. म्हणजे कोल्हे निर्माते नाहीत किंवा ते कोणतीही भूमिका करू शकतात हे त्यांच्याबाबत अर्ध सत्य आहे. तसेच गांधी मारले म्हणून मरत नाही हे देखील त्यांनी समजून घ्यायला हवे.

Exit mobile version